नागपूर : देशातील जवळपास १२ ते १५ राज्यांत नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या नागपुरात सक्रिय होत्या. गुन्हे शाखेने राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक केली. त्यापैकी सर्वाधिक बाळांची विक्री करणाऱ्या आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे टोळीवर नागपूर पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली. राज्यातील ही पहिलीच कारवाई नागपुरातून करण्यात आली. उपराजधानीतून नवजात बाळांची विक्री होत असल्याबाबत वृत्त मालिका ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती, हे विशेष.

गेल्या काही महिन्यांत शहरात नवजात बाळ विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. अनेक राज्यातील निपुत्रिक दाम्पत्य नागपुरात येऊन ८ ते १० लाख रुपयांत नवजात बाळ खरेदी करीत होते. या टोळ्यांच्या गोरखधंद्यामध्ये कोटींची उलाढाल होती. ‘लोकसत्ता’ने नवजात बाळविक्री होत असल्याबाबत वृत्त मालिका प्रकाशित करताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताची दखल घेऊन तत्कालीन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, अनैतिक मानवी तस्करी विभागाच्या (एएचटीयू) प्रमुख रेखा संकपाळ यांच्या पथकाला जबाबदारी सोपवली.

हेही वाचा – वर्धा : “निष्ठावंतांना डावलल्याने कर्नाटकात भाजपाचा पराभव, पक्षाने बोध घ्यावा”, आमदार दादाराव केचे यांचा घरचा आहेर

‘एएचटीयू’ पथकाने तपासात तब्बल ८ टोळ्या शोधून काढल्या. बाळ विक्रीत सहभागी होणारे डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह ५८ आरोपी शोधून काढले. त्यात आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे ही टोळीची मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. आयेशाने आतापर्यंत जवळपास शंभरावर बाळांची विक्री केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या टोळीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. आयेशा ऊर्फ श्वेता, तिचा पती मकबुल खान, सचिन पाटील, डॉ. नितेश मौर्य, डॉ. रितेश मोटवानी, सलामुल्ला खान, रेखा आप्पासो पुजारी, मुन्नीबाई द्वारकाप्रसाद लिलारे अशी मकोका लागलेल्या आरोपींची नावे आहेत.

बोगस रुग्णालय आणि तोतया डॉक्टर

अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्यांना जाळ्यात ओढून तिच्या नवजात बाळाचा सौदा आयेशा खान करीत होती. धंतोलीतील एका रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी असलेल्या आयेशाने बोगस रुग्णालय उघडले. स्वतः प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर असल्याचा फलक लावला. त्या रुग्णालयात तोतया डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा भरणा केला. या रुग्णालयात अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुली, अविवाहित तरुणी किंवा विधवा यांची प्रसूती करण्यात येत होती. त्यांच्या बाळांची विक्री अन्य राज्यात करण्यात येत होती.

हेही वाचा – नागपूर : ओबीसी, व्हीजेएनटींना प्रशिक्षणासह रोजगारक्षम बनवण्यावर भर; ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवजात बाळांची विक्री करणाऱ्या आयेशा खान ऊर्फ श्वेता सावळे हिच्या टोळीवर आक्रमक पवित्रा घेत ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली. राज्यातील अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. बाळविक्रीचा कोणताही प्रकार होऊ नये म्हणून गुन्हे शाखा सतर्क आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.