वर्धा : राज्यात नव्याने ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सूरू करण्याचा निर्णय झाला, तेव्हा वर्धा जिल्ह्यातील असे महाविद्यालय कुठे सूरू होणार, असे प्रश्न सूरू झाले होते. वर्धा शहरात हे महाविद्यालय होणार म्हणून त्याची जागा पण निश्चित करण्यात आली. पण तिकडे हिंगणघाट शहरातच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूरू व्हावे म्हणून आंदोलन सूरू झाले होते. तीन महिने हे आंदोलन सुरूच होते.
आंदोलकांनी आमदार समीर कुणावार यांनाही गळ घातली त्यांनी पण हा विषय रेटून धरला होता. इतकेच नव्हे तर महाविद्यालय हिंगणघाटमध्ये नं झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करीत खळबळ उडवून दिली. दरम्यान हे महाविद्यालय आर्वीत सुरू व्हावे म्हणून धावपळ सूरू झाली. वर्धा, आर्वी की हिंगणघाट यापैकी महाविद्यालय कुठे ? असा पेच झाला.
त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच होणार, अशी घोषणा करून टाकली. तर आर्वीत भागीदारी तत्ववार वैद्यकीय महाविद्यालय देणार असल्याचे पण फडणवीस यांनी सांगून टाकले होते. आर्वीत जागा पक्की तर हिंगणघाट येथे जागेचा घोळ सूरू झाला. अखेर कृषी खात्याची जागा या महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली. पण काम मार्गी लागत नसल्याचे पाहून हिंगणघाटकर अस्वस्थ होत विचारणा करू लागले होते.
आता एक घडामोड झाली आहे. मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वर्धा जिल्ह्यासंदर्भात बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालया बाबत पविचारणा केल्याचे आमदार समीर कुणावार म्हणाले. या विषयावर पून्हा बैठक घेतल्या जाणार आहे. प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. टेंडर निघेल. जानेवारीत प्रत्यक्ष कामास सुरवात होण्याची खात्री वाटते, अशी माहिती आमदार कुणावार यांनी दिली आहे.
हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा विषय गत दोन वर्षांपासून राहला आहे. संघर्ष समितीने सलग २०८ दिवस आंदोलन चालविले. पुढे या वादात हाणामारी पण झाली. अखेर जागा निश्चित झाली आणि वातावरण मवाळ झाले. त्या काळात जागेचा निर्णय तातडीने व्हावा म्हणून सर्व ते प्रयत्न झाले.
आमदार कुणावार यांनी आपण जागेबाबत आग्रही नाही, कोणतीही जागा वैद्यकीय निकषवार मान्य करा. हा राजकीय नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे. लोकांना मी उत्तर देवू शकलो पाहिजे. अशीच आपली भूमिका आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पण हेच सांगितल्याचे ते म्हणाले. आता ताजी घडामोड आश्वासक असल्याचे म्हटल्या जात आहे.