महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींमधील आजारांचे सूक्ष्म अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ‘ब्लाॅसम’ प्रकल्पाचा सोमवारी गडचिरोलीत हिदूर या नक्षलग्रस्त गावात प्रारंभ झाला. शिबिरातील गोंडस मूल बघून (लेफ्टनंटन जनरल- निवृत्त) विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वत: मुलांची तपासणी व उपचार केले. त्यामुळे विद्यापीठाच्या २५ वर्षांच्या इतिहासात दुर्गम गावात उपचार करणाऱ्या डॉ. कानिटकर या पहिल्या कुलगुरू ठरल्या आहेत, हे विशेष.

हेही वाचा >>>गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’

आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प ९ ऑगस्ट २०२२ रोजी नागपुरात सुरू झाला होता. पहिल्या टप्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी ८ गावात ९५ टक्क्यांहून जास्त आदिवासींची संख्या असलेल्या गावात प्रकल्पावर काम सुरू झाले. त्याअंतर्गत तेथील दुर्गम गावात शिबिरातून आदिवासींना वैद्यकीय तपासणी, उपचार व त्यांचे रक्त नमुने घेतले गेले. गडचिरोलीत २३ जानेवारी २०२३ रोजी प्रकल्पाचा प्रारंभ झाला.

हेही वाचा >>>VIDEO: “धीरेंद्र महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण…”, नागपूर पोलीस आयुक्तांचं मोठं विधान

गडचिरोलीतील दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील हिदूर या नक्षलग्रस्त गावातील कार्यक्रमाला आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कानिटकर आल्या होत्या. त्यांनी शिबीराचे प्राथमिक निरीक्षण केले असता येथे एका ग्रामीण रुग्णालयात जन्म झालेल्या चिमुकल्याला ‘बीसीजी’ लस लावली नसल्याचे निदर्शनात आले. तर दुसऱ्या मुलाला जन्मजात मेंदूला प्राणवायूचा पुरवठा नसल्याने इजा होऊन ‘सेरिब्लस पाल्सी’चा आजार असल्याचे पुढे आले. त्यांनी लगेच एका डॉक्टरनजिकच्या टेबलवर बसून ‘स्टेथेस्कोप’ घेत या मुलांची तपासणी व उपचार सुरू केले. त्यापैकी एकाच्या आईला व्यायामाची पद्धतही शिकवली. डॉ. कानिटकर या स्वत: बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी शिबिरात आलेल्या गोंड व माडिया या आदिवासींसोबत चटईवर बसून गप्पा मारल्या, आदिवासी महिलांचे तोंड गोळ करून त्यांच्याशी संवाद साधला. तर चिमुकल्यांसोबत प्रश्न-उत्तर खेळ खेळून सगळ्यांना चाॅकलेटचा खाऊ दिला.
या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या नागपूर विभागाचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, डॉ. दिलीप गोळे, डॉ. किरन टवलारे, डॉ. कल्पना टवलारे, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. मानसी कुंटे, डॉ. भालचंद्र फलके, डॉ. अजित सावजी, रवींद्र ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे.कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. भारती तिरणकर, डॉ. सतीश तिरणकर यांनी परिश्रम घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical services in naxal affected hidur village by vicechancellor of health university mnb 82 amy
First published on: 25-01-2023 at 18:17 IST