बुलढाणा : विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा त्याग केला. विकासाच्या नावाखाली त्यांनी हा त्याग केला किंवा करवून घेण्यात आला आहे. मात्र त्या मोबदल्यात त्यांना त्यांचे पूर्ण हक्क मिळाले नाही. हे केवळ विदर्भाचेच नव्हे तर राज्यातील प्रातिनिधिक चित्र असल्याची मनस्वी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या निवासस्थानातून ‘त्या’ला केले जेरबंद, धावा केल्यावर “श्रीराम”ने केले भयमुक्त; नेमका काय आहे प्रकार?

शेगाव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे प्रांतअधिवेशन व महामेळावा पार पडला. प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणारे मनोज चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी ज्ञानेश्वरदादा पाटील हे होते. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शन करणाऱ्या मेघाताई पाटकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना वरीलप्रमाणे खंतवजा प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रकल्प बाधितांच्या समस्यांचा ऊहापोह केला. हे हक्क मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सामूहिक संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.