अमरावती : सध्या संपूर्ण मेळघाटात वाघाची दहशत पसरली असून, गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखलदरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अनेकांना वाघ दिसल्याने या पर्यटनस्थळी दिवस मावळताच शुकशुकाट पसरत आहे. सायंकाळ होताच वन विभाग आणि पोलीस पथकांचे वाहन गस्त घालत असून, शहराच्या विविध भागांत सावधतेचा इशारा देणारे पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत.

सायंकाळी सहा वाजताच संचारबंदीसदृश परिस्थिती दिवसभर पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेल्या चिखलदरा शहरात सायंकाळी सहा वाजताच वन उद्यान परिसर, स्काय वॉक पॉईंट, गाविलगड किल्ला, ठाकूर पॉईंट, देवी पॉईंट अशा अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती दिसून येत आहे. अजून पुरेसा उजेड असतानाच वन उद्यान परिसरातील हॉटेल्स सायंकाळी ५.३० ते ६ दरम्यान बंद होत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारा बाजार चौकही सायंकाळी ७.३० वाजता बंद होतो. विशेष म्हणजे, सकाळी उजाडल्यावरही ७.३० वाजेपर्यंत रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. ८ ते ८.३० नंतरच वाहनांची ये-जा सुरू होते.

वाघाच्या वाढलेल्या फेऱ्यांमुळे भीती

गुगामल वन्यजीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या या परिसरात पूर्वीपासून वाघाचा वावर असला तरी, तो इतक्या वारंवार दिसत नव्हता. मात्र, यावेळी वाघाने जणू परिसरातच ठाण मांडले आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी ठाकूर पॉईंट परिसरात वाघाची डरकाळी स्वतः ऐकली, तर दहा दिवसांपूर्वी आमच्यासमोर अस्वल आले होते. यामुळे सध्या पोलीस आणि वन विभाग सतर्क आहेत. स्थानिक आणि पर्यटकांना कुठे फिरायला जायचं आणि कुठे नाही, याबाबत सूचना दिल्या जात आहेत, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

‘विनाकारण घराबाहेर फिरू नका’

चिखलदरा परिसरात काही जणांना वाघ दिसल्याने वन्यजीव विभागाचे पथक अंधार पडताच गस्त घालण्यास सुरुवात करते. सायंकाळी महत्त्वाचं काम नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना आम्ही देत आहोत. खूपच गरज असेल तर पाच-सहा जणांच्या गटाने बाहेर पडा. पर्यटकांनाही परिस्थितीची माहिती दिली जात आहे, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहा ठिकाणी ‘ट्रॅप कॅमेरे’

वन विभागाचे कर्मचारी सकाळी गस्त घालत आहेत. तसेच, पायवाटांवर दहा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. सायंकाळी शासकीय वाहनांद्वारे सूचना देण्यासोबतच जनजागृतीही केली जात असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.