गेल्या सहा ते सात वर्षात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पाच ते सहा गावांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहे. गावांच्या स्थलांतरणनंतर मोकळ्या झालेल्या जागेवर गवत लावले. त्या वाढलेल्या गवतामुळे वन्यजीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघांची संख्या सात ते आठने वाढली, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.

हेही वाचा >>>प्रकाश आंबेडकर यांचे संघाच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र; म्हणाले, “सरसंघचालकांनी कधी…”

गावांच्या स्थलांतरणामुळे ताडोबातील वन्यजीव मोठ्या संख्येत वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर नवीन गवताळ प्रदेशातील पर्यावरणाच्या आरोग्याची पाहणी करण्यासाठी चंद्रपूरचे अभ्यासक व अशासकीय संस्थांचे पदाधिकारी यांनी शनिवार १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ताडोबाच्या कोर भागातून स्थलांतरित झालेल्या गावांच्या जमिनीवर पाहणी केली. नव्याने पुनर्स्थापित गवताळ प्रदेश सर्व प्रकारचे वन्यजीव आणि शिकार प्रजातींसाठी आवश्यक चर, लपण्याची आणि प्रजननासाठी जागा प्रदान करतात. काही वनौषधी, झुडुपे आणि जंगली शेंगायुक्त वनस्पतींचे सतत आच्छादन असलेल्या गवताळ प्रदेशात वनस्पतींचे प्राबल्य असलेले विशिष्ट क्षेत्र आहेत. लहान, मध्यम आणि उंच असे तीन प्रकारचे गवत या गावांच्या क्षेत्रात विकसित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>वर्धा : शिक्षकांचा महसूल खात्यास सवाल; म्हणे, “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…”

१९७२ च्या सुमारास खातोडा आणि पांढरपौनी, २००६ च्या सुमारास बोटेझरी आणि अर्धे कोळसा यानंतर मागील काही वर्षात जामणी, पळसगाव, रामदेवी नवेगाव, रानतळोधी इत्यादी गावांचे यशस्वीरित्या कोर क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे. गावे जंगला बाहेर गेल्याने मोकळ्या जागेत पुन्हा गवत व झाडे लावण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की त्या भागातील वन्यजीव संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चितळ, सांबर तथा इतर प्राण्यांसोबतच वाघांची संख्या सात ते आठ ने वाढली आहे. हा अतिशय दुर्मिळ व सकारात्मक बदल येथे बघण्यास मिळाला आहे.