अकोला : शहरात चक्क औरंगजेब, इब्राहीम गाझी यांच्या फलकावर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून त्याची चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील शांतता व एकोप्याला बाधा निर्माण करणाऱ्या या कृती विरोधात पोलिसांनी तीन तरुणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त शहरातून मंगळवारी मिरवणूक काढण्यात आली होती. यातून राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. ईद ५ सप्टेंबरला झाली असली तरी गणेशोत्सवामुळे तीन दिवसानंतर मंगळवारी मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये आठ ते १० जणांनी शहरातील बियाणी चौकात औरंगजेब, इब्राहीम गाझी यांचे फलकावर दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला. त्याची चित्रफित तयार करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावल्या. तसेच त्यांच्या या कृतीमुळे शहरातील शांतता व एकोप्याला बाधा निर्माण होण्यााची स्थिती निर्माण झाली.

मिरवणूक मार्गाव्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे आदेशाने उल्लंघन केल्याने आठ ते १० अनोळखी व्यक्तींविरूध्द शहर कोतवाली पोलिसांनी कलम १९६, ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चित्रफितीच्या माध्यमातून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात आला.

या प्रकरणात सैय्यद शारीक सैय्यद जमीर (वय २७ वर्षे, रा. जमजम पार्क, गंगानगर), शेख आसीफ शेख अलताफ, (वय २७ वर्षे, रा. हमजा प्लॉट, जुने शहर), मोहीन खान मतीन खान (वय २७ वर्षे, रा. मॉडर्न शाळेजवळ, गंगानगर) यांना गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आले. आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर अनोळखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई, पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोहवा अश्विन सिरसाट, पोहवा अजय भटकर पोहवा ख्वाजा शेख व पोकॉ. शैलेश घुगे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले हे करीत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधितांनावर कारवाईचा बडगा उगारून या प्रकारचे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.