लोकसत्ता टीम

अमरावती: ‘गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. तीन वेळा शपथविधी झालेत. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आताच सांगता येणार नाही,’ असे सूचक वक्‍तव्‍य अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू यांनी येथे प्रसारमाध्‍यमांशी बोलताना केले. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्‍या आहेत.

आम्‍ही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्‍यासोबत युती करायची की नाही, हे अजून ठरलेले नाही. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. युती करायची की नाही, हे निवडणुकीआधी ठरवू. अजून काहीच ठरलेले नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जागावाटपासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, चुकून त्यांनी वक्तव्य केले हे तपासले पाहिजे, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.

आणखी वाचा- अमरावती : सुटीच्या दिवशीही संपकर्त्यांचा जिल्‍हा परिषदेसमोर डेरा; सोमवारी ‘थाली बजाओ आंदोलन’

‘गॅरंटी कुणाचीच घेता येत नसते’, अशा शब्‍दात सूचक संकेत देत बच्‍चू कडू म्‍हणाले, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. तीन वेळा शपथविधी झालेत. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार, हे आताच सांगता येणार नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीच्‍या जागावाटपाबाबत भाष्य केले होते. त्यांनी भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये,म्हणून भाजपाने भाषणाची चित्रफित समाजमाध्‍यमांवरून हटवली होती. पण, त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षाच्‍या नेत्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण झाल्‍याचे दिसून आले आहे.