सर्व प्रमुख विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे धोरण नागपुरात पक्षाने स्वीकारले असताना केवळ त्यांचीच उमेदवारी नाकारल्याने दक्षिण नागपूरचे भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे हे नाराज झाले असून त्यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच पुढचा निर्णय घेऊ, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात शहरातील सहा पैकी पाच ठिकाणी विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र फक्त सुधाकर कोहळे यांच्या ऐवजी दक्षिण नागपुरातून पक्षाचे माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी नाकारण्यात आल्याने कोहळे प्रचंड नाराज झाले. यादीत नाव नसल्याचे कळताच कोहळे यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानी गोळा होऊ लागले. त्यांनी सुधाकर कोहळे आगे बढोच्या घोषणा दिल्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये कोहळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात, हे येथे उल्लेखनीय.

२०१४ च्या निवडणुकीत कोहळे यांनी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामे केली. शहर अध्यक्ष म्हणूनही त्यांनी  जबाबदारी सांभाळली. त्यामुळे कोहळे यांना उमेदवारी निश्चित मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. दुसरीकडे पक्षाचे माजी आमदार मोहन मते यांनी सुद्धा यावेळी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मतेंसाठी आग्रही होते. त्यामुळे कोहळेंऐवजी मतेंना संधी मिळाली. पण, त्यामुळे कोहळे नाराज झाले असून त्यांची समजूत कशी काढावी हा प्रश्न पक्षापुढे आहे.

दरम्यान, कोहळे यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहे. त्यांची समजूतघातली जाईल. पक्षात कोणीही बंडखोरी करणार नाही, असे भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी सांगितले.

मोहन मते यांचे पुनरागमन

नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि त्याच वर्षी आमदार अशी एकापाठोपाठ एक महत्त्वाची पदे भूषवणारे व नंतर राजकीय विजनवासात गेलेले भाजपचे माजी आमदार मोहन मते यांना भाजपने विद्यमान आमदाराला उमेदवारी नाकारून दक्षिण नागपुरातून संधी देत सक्रिय राजकारणात पुनरागमनाची संधी दली आहे. मते हे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

मुख्यमंत्री फडणवीस आणि मोहन मते यांची राजकीय कारकीर्द एकाच वेळी महापालिकेतून सुरू झाली. १९९७ मध्ये हे दोघेही नगरसेवक होते. फडणवीस महापौर असताना मते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हे दोघेही अनुक्रमे दक्षिण आणि पश्चिम नागपूर मतदारसांतून निवडून गेले. त्यानंतर झालेल्या २००४ च्या निवडणुकीत मते पराभूत झाल्यावर त्यांनी वेगळी वाट धरली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्याने ते पक्षापासून दूर गेले. त्यानंतर त्यांनी एकदा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली, पण त्यांना यश आले नाही. २०१४ च्या लोकसभा  निवडणुकीत नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित झाल्यावर मते यांना भाजपने पुन्हा जवळ केले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. राज्याचे मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे गेल्यावर मते यांनी दक्षिणसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. दोन वर्षांत ते अधिक सक्रिय झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी गडकरींच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. त्यांच्या ‘माध्यम’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेशी संपर्क ठेवला. तीन महिन्यांपूर्वी रेशीमबाग परिसरात त्यांनी माध्यम प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू केले त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे गडकरी आणि फडणवीस यांच्या सहमतीनेच त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

दक्षिण नागपुरातून मला डावलून मते यांना उमेदवारी दिली. हा पक्षाने माझ्यावर केलेला अन्याय आहे. पक्षाने याचा पुनर्विचार करावा. पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. शहर अध्यक्ष म्हणून  संघटनात्मक  पातळीवरही पक्ष बळकट करण्याचे काम केले. माझे कुठे चुकले ते पक्षश्रेष्ठींनी सांगावे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्या त्यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेणार आहे. – सुधाकर कोहळे, विद्यमान आमदार, भाजप.