तसा हा प्रकार साधाच. नोंद न घेण्यासारखा. अनेक ठिकाणी असले राजकीय माज दाखवणारे प्रसंग घडतात. अलीकडे तर त्याला अक्षरश: ऊत आलेला. कारण सत्तेची हवा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाच्या डोक्यात शिरलेली. म्हणून दखल तरी कुणाकुणाची घ्यावी? मात्र चंद्रपूरचे प्रकरण जरा वेगळे. स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेणारे भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांशी संबंधित. अतिशय गरिबीतून वर आलेले पण आता श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात जराही कसर न ठेवणारे हे महाशय अलीकडे फारच चर्चेत. त्यांच्यावर ‘अपार’ प्रेम करणाऱ्या एका फुटपाथ व्यावसायिक संघटनेने त्यांच्या आईचे नाव एका चौकाला देण्याचे पत्र महापालिकेला दिले. या पालिकेच्या ‘कणाहीन’ आयुक्तांनी लगेच तसा ठराव मंजूर करून घेत तिथे फलक उभारण्याची प्रक्रिया सुरू केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार रोखून धरला असे या प्रसंगाचे स्वरूप.
मुळात असे काही नामकरण करायचे असेल तर तिथे चौक असावा लागतो. म्हणजे चार रस्ते एकत्र येतात अशी जागा. तशी ती नाहीच. तरीही हा प्रकार घडला. ‘अम्मा चौक’ असे नावही ठरले.
जोरगेवारांच्या आई म्हणजे अम्मांनी त्यांच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या वा कष्ट उपसले त्याविषयी आदरच. अनेकांचे आईवडील मुलांसाठी हे करत असतात. यातला प्रत्येकजण चौकाला त्यांचे नाव देण्याची मनीषा पूर्ण करू शकत नाही. मात्र जोरगेवार पडले आमदार. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजपचे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुनगंटीवारांचे नाक कापण्यासाठी पक्षनेत्यांनी त्यांच्यामागे सारी शक्ती उभी केलेली. त्यामुळे ते अलीकडे हवेतच असतात. जमिनीशी त्यांचे नाते पार तुटलेले. त्यातून हा प्रकार घडला. आता मुद्दा असा की चंद्रपूरकरांनी दोनदा निवडून दिले म्हणजे हे शहर आपल्या मालकीचे झाले असे या आमदारांना वाटते काय? हे निवडून देणे लोकांची कामे तसेच या ‘बकाल’ शहराचा विकास करण्यासाठी आहे याचा विसर या आमदारांना पडला काय? तुमची आई तुमच्यासाठी श्रेष्ठ असेल व असावीच. तिची आठवण सतत तेवत राहावी म्हणून तुम्ही जो काही दानधर्म करता, समाजोपयोगी उपक्रम राबवता ते कौतुकास्पद. मात्र त्यांच्या नावाने चौकही ओळखला जावा हा अट्टाहास कशासाठी? हे जे काही झाले त्यात माझा सहभाग नाही, त्या संघटनेची मागणी होती असे जोगरेवार निश्चित म्हणू शकतात. तेवढी चतुराई त्यांनी दाखवलीच आहे. मात्र हे सारे घडत असताना आपल्याला काहीच ठाऊक नव्हते असा बनाव ते करू शकत नाही.
सध्या या शहरात टाचणीही पडली तरी ती जोरगेवारांना कळते अशी स्थिती. मग या व्यक्तीस्तोमाच्या प्रकाराला त्यांनी अटकाव का केला नाही? ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे धोरणच व्यक्तिमहात्म्यविरोधी. काँग्रेसने प्रत्येक प्रकल्प वा योजनेला नेहरू, गांधींची नावे दिली. आम्ही तसे करणार नाही. पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्याच पदनामाने योजना राबवू असे पक्षाने अनेकदा जाहीर केले व प्रत्यक्ष कृतीही तशी केलेली. अलीकडे नव्याने या पक्षात सामील झालेल्या जोरगेवारांना हे ठाऊक नाही काय? या शहरातला गांधी चौक हा अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार. सध्या भाजपसाठी सुद्धा गांधी प्रात:स्मरणीय तरीही त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचे धाडस झालेच कसे? याच जोरगेवारांनी अपक्ष म्हणून निवडून येताना दोनशे युनिट वीज मोफत असे आश्वासन जनतेला दिले होते, त्याचे काय झाले? तेव्हा ते सत्ताधारी समर्थक होते. आता तर थेट सत्ताधारी. मग या आश्वासनाची पूर्ती करायला हरकत काय? होत नसेल तर जनतेची जाहीर माफी मागण्याची हिंमत जोरगेवार दाखवतील काय?
या शहरात तसेच जिल्ह्यात वनप्रबोधनी, सैनिकी शाळा, विद्यापीठ, टाटांचे कर्करोग रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत, असे अनेक प्रकल्प आले ते मुनगंटीवारांच्या कार्यकाळात. जोरगेवार असे एकतरी उदाहरण सांगू शकतील काय? आपल्या आधीच्या नेत्याने जे उभे केले, त्याची पाहणी करणे एवढेच काम हे महोदय आजवर करत आले. याला श्रेय लाटणे म्हणतात. आपल्यालाही श्रेय घेता यावे असे त्यांना वाटत नसेल तर ते कसले कार्यसम्राट? यांच्या नावावर काय तर एका नाल्यावरची भिंत. तीही मैत्री निभावण्यासाठी उभी केलेली. मुनगंटीवारांना शह देण्यासाठी सध्याचे सत्ताधारी आपल्याला बळ देत आहेत याने जोरगेवार कदाचित हुरळून गेले असावेत. मात्र राजकारणात एकच परिस्थिती कधीच कायम नसते. याचे भान त्यांनी बाळगलेले बरे!
पक्ष कोणताही असो, त्यात असलेले श्रेष्ठी काट्याने काटा काढण्याचे काम अविरत करत असतात. आज जोरगेवार तर उद्या दुसरे कुणी अशी स्वच्छ भूमिका त्यामागे असते. अनेक वर्षे राजकारणात मुरलेल्या या आमदाराला हे नक्की कळत असावे. अशी स्थिती निर्माण झाली तर त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठी करून घ्यायचा हा साधा स्वार्थ. तो पदरात पाडून न घेता जोरगेवारांची गाडी भलत्याच दिशेने सुसाट निघालेली. भविष्यात एखादा राजकीय अपघात झाल्यावरच त्यांना त्यांची दिशा चुकल्याची जाणीव होईल. पैशाभोवती फिरणाऱ्या या राजकारणाने हा जिल्हा पूर्णपणे नासवला गेलाय. भविष्यात याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील हे वक्तव्य आहे संघ परिवारातील एका महनियांचे. यावरून वरचे लोक या जिल्ह्यातल्या घडामोडीकडे कसे बघतात याची कल्पना साऱ्यांना यावी. मुनगंटीवारांनी जे केले त्यापेक्षा जास्त मी करून दाखवीन असे स्वप्न उराशी बाळगून तशी वाटचाल करणे याला राजकारण म्हणतात. दुर्दैवाने जोरगेवारांना याचाच विसर पडलाय.
या जिल्ह्यात अनेक मोठे नेते होऊन गेले. यात काँग्रेसचेही होते व भाजपचे सुद्धा! पण कुणीही इतक्या खालच्या स्तरावरचे राजकारण केले नाही. लोकांच्या नजरेत भरेल असा उन्माद दाखवला नाही. नुसती ‘शो-बाजी’ करणे म्हणजे राजकारण नाही. भाजपमधील अनेक नेत्यांनी हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून स्वत:ला घडवले. हे ठाऊक असूनही जोरगेवार असे का वागतात? पक्ष कोणताही असो, त्यात व्यक्तिपूजेला महत्त्व आले की त्याचा ऱ्हास सुरू होतो. काँग्रेसची आजची अवस्था झाली ती यामुळेच. म्हणून भाजपने सामूहिक जबाबदारीचे धोरण स्वीकारले. त्याला छेद देण्याचे काम आमदारच करू लागले तर या धोरणाला अर्थ काय?
राजकारणात कुणाचा द्वेष करून मोठे होता येत नाही. हे तत्त्व केवळ जोरगेवारच नाही तर सर्वांना लागू. त्याचा विसर पडू न देणेच इष्ट! त्यामुळे भविष्यातले राजकारण लक्षात घेऊन जोरगेवारांनी आतातरी जमिनीवर यावे व अशा सत्तेचा दुरुपयोग दाखवणाऱ्या नामकरणासारख्या गोष्टी टाळाव्यात. त्यातच त्यांचे भले अन्यथा आहे तोही दिवा विझेल. दोनशे युनिटची गोष्ट तर दूरच राहिली.