लोकसत्ता टीम

वाशीम: येथील बस स्थानकाजवळील विश्रामगृहासाठी आदेशित असलेले पेव्हर ब्लॉकचे काम विश्राम भवनात सुरू आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता राजेंद्र घिनमीने यांनी केलेल्या चुकीच्या कामाची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार लखन मलीक यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १० फेब्रुवारी २०२२ रोजी पारित आदेशानुसार स्थानिक बसस्थानक जवळील विश्रामगृहात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली होती. परंतु नवीन ठिकाणी कुठल्याही कामाची आवश्यकता नसताना देखील सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता घिनमीने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करून नवीन विश्राम भवन या ठिकाणी रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता घेतली आहे.

हेही वाचा… ‘घोडनकप्पी’ आदिवासी ग्रामस्थांची ‘मन की बात’ कोण ऐकणार? निजामकालीन तेलंगणा – महाराष्ट्र सीमेवरील दुर्लक्षित गाव

प्रशासकीय मान्यता विश्रामगृहात पेव्हर ब्लॉक बसविणे अशी आहे. परंतु सदर काम प्रशासकीय मान्यतेनुसार न करता विश्राम भवन येथे संबंधित अधिकार्‍याने काम सुरू केले आहे. तसेच सदर ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यावरील डांबरी थर क्षतीग्रस्त आहे व दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत. सदर काम ३०.१०% कमी दराने भरले आहे. त्यामुळे काम देखील निकृष्ट दर्जाचे होणार आहे. तसेच सदर कामाची मान्यता ही १० फेब्रुवारी २०२२ रोजी दिली आहे. यानंतर एक वर्ष कामाचा कार्यरंभ आदेश न दिल्यामुळे या कामाचा निधी शासनाकडे समर्पित करण्यासाठी देखील नियोजन विभागाकडून कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड यांना सूचित करण्यात आले होते. तरी देखील निधी सपर्मित केला नाही व एक वर्षाच्या कालावधीनंतर १३ मार्च २०२३ रोजी कामाचा कार्यरंभ आदेश दिला आहे.

हेही वाचा… अकोला : रस्त्यांवरील बालकांचे सर्वेक्षणातून पुनर्वसन होणार

त्यामुळे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे या संपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करून कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता घिनमीने यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी आ. लखन मलीक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रार पत्राव्दारे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या ठिकाणी कामाला मान्यता मिळाली आहे त्याच ठिकाणी नियमानुसार काम सुरू आहे.” – मिठेवाड, कार्यकारी अभियंता