अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस महिला पोलीस अधिकारी यांच्या वादग्रस्त संवादाच्या चित्रफित प्रकरणात भाष्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भूमिकेतून बिनशर्त माघार घेतली आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत पोलीस अधिकाऱ्यांबद्दल मला आदर असल्याचे म्हटले. ती भूमिका वैयक्तिक होती, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नव्हता, असे स्पष्टीकरण देखील अमोल मिटकरी यांनी दिले आहे.

सोलापूर कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. अजित पवार व संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या संवादाची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रचंड प्रसारित झाली. त्या चित्रफितीतील संभाषणावरून राज्यात वाद निर्माण झाला. या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेऊन अजित पवारांची पाठराखण केली.

संबंधित महिला अधिकाऱ्यांवर कठोर टीका देखील केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची ही मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात दुसऱ्याच दिवशी अमोल मिटकरी यांनी आपल्या भूमिकेतून माघार घेतली आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

‘महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांची वागणूक अयोग्य आहे. त्यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केली. आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्त झालेल्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांची माहिती नसेल तर त्यांच्या शिक्षणावर संशय येतो. पूजा खेडकरांच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, यासाठी आयोगाला पत्र पाठवले आहे. चौकशी करून तत्काळ निलंबित करावे. नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असू शकतो,’ असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला होता. संविधानानुसार सर्वांना समान अधिकार आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला त्याचे काय?.’ असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.

माघार घेताना काय म्हणाले अमोल मिटकरी?

‘सोलापुर घटनेसंदर्भात केलेले भाष्य मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,’ असे स्पष्टीकरण आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहे.