भंडारा : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत (शिंदे गट) एक वादग्रस्त विधान केले होते. भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना ‘शिवसेनेचा बाप मीच आहे’ असे बेताल वक्तव्य त्यांनी केले होते.
त्यांच्या या विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली. आमदार परिणय फुके यांनी माफी मागण्याची आक्रमक भूमिका शिंदे सेनेने घेतली. अखेर हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच आमदार परिणय फुके यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागून या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.
आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे सेना भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातूनच महायुतीतील घटक पक्षामुळेच आपल्या उमेदवारांना पराभवाला समोर जावे लागले असा आरोपही शिंदे सेनेने केला होता.
एवढेच नाही तर यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण स्वबळावर लढण्याचा इशाराही शिंदे सेनेने दिला होता. त्या वरून कोणतीही वाईट गोष्ट घडली की त्याचे खापर आपल्यावरच फोडले जाते जणू काही मीच शिवसेनेचा बाप आहे असे वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी केले होते. या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत माफीची मागणी केली होती.
या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची भूमिका मांडली होती. आमदार फुके यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याची फडणवीस यांनी सारवासारव करताच महायुतीत वाद चिघळणार अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र, आज आमदार परीने फुके यांनी शिंदे सेनेची माफी मागितली.
आमदार परिणय फुके यांनी दिलेल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. परंतु, माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.”
नेमकं काय म्हणाले परिणय फुके ?
भंडाऱ्यातील कार्यक्रमात बोलताना परिणय फुके म्हणाले, “माझ्यावर अनेक लोक आरोप करत आहेत. पण मी कोणत्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु माझ्या लक्षात आले, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले, असं म्हटल जातं. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापाला दिला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. कारण खापर माझ्यावर फोडले जाते आहे.”
फुकेंच्या विधानावर शिंदे गटाची नाराजी
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी आमदार फुके यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा विधानांमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले होते. तसेच परिणय फुके यांनी लवकरात लवकर माफी मागवी, अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला होता.
यासंदर्भात पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते संजय कुंभलकर म्हणाले होते की, “शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.”. पुढे बोलताना, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा वाचाळवीर नेत्यांना आवर घालावा, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण हे आम्ही दाखवून देऊ”, असा इशाराही कुंभलकर यांनी दिला होता. “आमदार परिणाम फुके यांनी लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.