चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर अतिशय धडाडीचे आक्रमक नेते होते. त्यांनी संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण केले. संकटांना तोंड देणाऱ्या, अनेक आव्हाने लीलया पेलणाऱ्या या नेत्याला कमकुवत करणाऱ्यांना कदापि विसरणार नाही, असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षातील विरोधकांना दिला. धानोरकर यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात संवाद प्रतिष्ठान तथा सर्व राजकीय पक्ष, शहरातील ३९ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटनांच्यावतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सारेच करतात. परंतु महिलांना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. मात्र, खासदारांनी मला राजकारणात आणले. साध्या गृहिणीला आमदार केले. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरातून केली. पतीच्या निधनानंतर खंबीर होण्याचा सल्ला हितचिंतक देतात. मात्र, आमच्या कुटुंबीयांवर आलेले संकट आणि आमच्या भावना कुणी समजू शकणार नाही. खासदार म्हणून काम करताना त्यांनी माणूस म्हणून संबंध जोपासले. पक्षाचा, जातीचा कधी विचार केला नाही. लोक साठ-सत्तर वर्षांचे आयुष्य जगतात. मला पन्नास वर्षांचे जगायचे आहे. जाईल तेव्हा सर्वांना हळहळ लावून जाईल. शासकीय इतमामात जाईल. माझ्यावर किती लोक प्रेम करीत होते, हे स्मशानभूमीतील गर्दी सांगेल, असे ते म्हणायचे. प्रत्येक शब्द खरा करून दाखवण्याची त्यांची जिद्द असायची. दुर्दैवाने हा शब्दसुद्धा त्यांनी खरा केला, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ‘ईव्हीएम’वर संशय असल्यास विकसित देशाप्रमाणे भारतातही ‘बॅलेट’वर निवडणूक घ्यायला हवी, ‘बीआरएस’चे के. चंद्रशेखर राव यांचे मत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शोकसंदेश द्रकश्राव्य माध्यमातून दाखवण्यात आला. धानोरकर हे लढवय्या होते. त्यांचे अकाली जाणे मनाला चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि लोकसभा मतदारसंघाचे नुकसान झाले, अशा शब्दांत आ. सुभाष धोटे, आ. सुधाकर अडबाले, आ. किशोर जोरगेवार, आ. अभिजित वंजारी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

हेही वाचा – नागपुरात ‘सी-२०’ च्या नावावर रोषणाईसाठी महिन्याला १.८५ लाख युनिट खर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी डॉ. अशोक जीवतोडे, माजी आमदार वामनराव चटप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजीव कक्कड, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासह बाळू खोब्रागडे, मधुसूदन रुंगठा, कीर्तीवर्धन दीक्षित, बळीराज धोटे, विनोद दत्तात्रेय, ॲड. विजय मोगरे, चंदू वासाडे, अनिरुद्ध वनकर, पप्पू देशमुख आणि तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी म्हणून साजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. प्रास्ताविक संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल यांनी केले.