बुलढाणा : मुंबई येथील आमदार निवासच्या कॅन्टीन मधील कर्मचारी मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे.यावरून सुरु झालेले राजकीय वादंग, वादळ काही निवळायचे नाव घेत नाहीये. आता त्यात बुलढाण्याचे वादग्रस्त, आक्रमक आमदार संजय गायकवाड यांचा सहभाग असल्याने तो लवकर मिटणार देखील नाही हे तेवढेच खरे.
शेगाव येथे या प्रकरणी बोलतांना आमदार गायकवाड यांनी ठाकरे सेनेच्या नेत्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.मारहाण प्रकरणी आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. सभापतीनी मात्र त्याची दखल घेतली नाही. यानंतर बुलढाण्यात परतल्यावर आमदार महोदयांनी मारहाणीचे समर्थन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्धल बोलतांना त्यांची जीभ घसरली. यापाठोपाठ विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर ‘ चड्डी बनियन शो’ सादर केला.त्यामुळे संतापलेल्या आमदार गायकवाड यांनी ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे व अनिल परब यांना धारेवर धरले आहे.
विदर्भ पंढरी शेगाव येथे शिंदे गटाच्या शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमानीं गायकवाड यांना गाठले. आमदार निवास राड्यावरून विरोधकांनी मंत्रालयात आंदोलन केल्याने यावर विचारणा केली असता त्यांनी चक्क अनील परब यांना असे संबोधून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा लोणारमध्ये आले होते तेंव्हा चड्डी बनियानचा आरोप करणाऱ्या आदित्यला मी चड्डी बनियनमध्ये वर घेऊन गेलो होतो. कारण उद्धवला त्याला घेऊन चढता येत नव्हतं.
अनिल परब चड्डी बनियानवरुन मला नाव ठेवतो. ते मंत्री असतांना मी त्यांच्या घरी गेलो होतो. ते नाश्ता करीत होते. ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये होतो तसेच होते. किंबहुना त्यांच्या अंगात बनियनसुद्धा नव्हतं. बरं आम्ही बनियनमध्ये माणूस तरी दिसतो. तो तर दिसत होता. त्याला आम्हाला बोलायचचा काय अधिकार? या रोखठोक उत्तराने राज्यात पुन्हा राजकीय वादंग उठण्याची आणि सेनेचे दोन्ही गट समोरासमोर येण्याची चिन्हे आहे.