नागपूर : विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.

हेही वाचा… Maharashtra News Live : सीमावादाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

मी आई आहेच, सोबतच आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले, अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा… Maharashtra Assembly Session: “ए शांत बसा रे”, CM शिंदे विरोधकांवर संतापले; अजित पवारांना म्हणाले “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ यांच्यासह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तान्हुल्यासह आलेल्या महिला आमदाराचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली. विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासूबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.