वर्धा : जनसुरक्षा विधेयक अखेर विधिमंडळात आवाजी मतदानाने पारित झाले. या विधेयकास उघड विरोध हा वर्धा जिल्ह्यातून झाला होता. मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. विशेष म्हणजे या विधेयकविरोधात असलेल्या आवाजाचे नेतृत्वच वर्धा जिल्ह्यातील गांधींवाद्यानी केल्याचा ताजा इतिहास आहे. हा असा कायदा व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व दमनशाहीचे प्रतीक ठरणारा राहील असा आरोप विधेयक विरोधकांनी केला होता.
आता अहिंसावादी गांधीजन हे हिंसावादी माओ समर्थकांना एक प्रकारे समर्थन करीत असल्याचा आरोप आमदार सुमीत वानखेडे यांनी केला आहे. गांधीवादी संस्थेत हे माओ समर्थक सेमिनार घेतात, संस्थांच्या सुविधाचा उपयोग घेतात, गांधी विचाराच्या बुरख्याआडून माओ अजेंडा राबवतात हे गंभीर आहे. माओवादी केंद्रीय समितीच्या संपर्कात असलेले काही या संस्थांमध्ये येऊन गेले आहे. ही बाब गांधीवादी संस्था संचालकांना माहित आहे की नाही, हे सांगता येणार नाही. पण त्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. सतर्क असले पाहिजे, असा ईशारा आमदार वानखेडे देतात.
माओचे तत्वज्ञान हे हिंसेवर आधारित आहे. हिंसेच्या धाकातून सत्तेचा मार्ग प्रशस्त होतो, हे त्या विचारसरणीचे सूत्र आहे. त्याच आधारे त्यांनी सत्ता प्राप्त केल्याचा इतिहास आहे. आता ते म्हणतात २०४७ साली लाल किल्ल्यावर लाल झेंडा फडकविणार. लाल किल्ला म्हणजे सत्तेचे प्रतीक. ज्या विचारसरणीवर भारताचे संविधान आहे त्याच्या नेमक्या विरोधाची माओ विचारसरणी आहे. आणि हेच विचारसरणी समर्थक संविधान बचाओच्या आंदोलनात अग्रभागी होते. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले.
संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला. त्यात काही प्रमाणात यश आले. आता त्याची परतफेड म्हणून जन सुरक्षा कायद्यास विरोध करण्यात आला, असा सणसणीत आरोप आमदार वानखेडे करतात. गांधीवादी संस्थेत जे विविध निमित्ताने येतात ते कोणाचे खरे समर्थक आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. कारण प्रश्न गांधी विचारसरणीचा आहे. माओ संघटनाशी संपर्कात असणारे संस्थेत येत असतील तर हा चिंतनाचा विषय होतो, असे आमदार वानखेडे नमूद करतात.
कारण माओवाद हा गांधीवादी अहिंसेच्या अगदी विरोधात आहे. अहिंसावादी गांधींजन हे हिंसावादी माओ समर्थकांना जवळ करीत असल्याची बाब त्यांना समजली की नाही, हे सांगता येत नाही, असेही ते म्हणतात.