यवतमाळ : काँग्रेस पक्षाच्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या युवकाच्या शोधात अमरावती पोलीस सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात येऊन गेले. अमरावती पोलिसांनी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांच्या मदतीने शेंबाळपिंपरी येथे जाऊन सदर तरुणाचा शोध घेतला. मात्र, हा तरुण गावात न आढळल्याने पोलीस आल्यापावलीच परतले.

अमरावती येथील काँग्रेसनगरमधील रहिवासी व प्रदेश काँग्रेसचे सचिव हरिभाऊ यादवराव मोहोड यांनी अमरावती येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. त्यात आमदार यशोमती ठाकूर यांचे अधिकृत ट्विटर हँडलवर 3० जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजता कैलास सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने ट्विटर हँडलवरून धमकी दिली. त्या ट्विटमध्ये ’दाभोळकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. धारकरी कोथळे बाहेर काढते, लक्षात असू द्या…’ अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>>गर्भातच डोळे मिटलेल्या बाळाचे मृत्यूपश्चात श्वानांनी लचके तोडले; यवतमाळच्या खासगी दवाखान्यातील घटनेने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कैलास सूर्यवंशी हा युवक यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथील रहिवासी असून तो उच्च शिक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तपासासाठी अमरावती पोलीस यवतमाळात पोहोचले खरे, मात्र शेंबाळपिंपरी येथे जाऊन सदर युवकाचा शोध घेतला तेव्हा तो सापडला नाही. हा युवक धारकरी आहे की नाही, हे चौकशीपूर्वी सांगता येणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.