चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू आहे. उन्हाचा पारा ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. जलाशय व तलाव आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी शहरी भागाकडे वळावं लागत आहे. अशाच एका घटनेत आज सोमवारी चंद्रपूर जिल्हा ग्राहक न्यायालयात एका घोरपडीने बस्तान मांडल्याने एकच तारांबळ उडाली. या अनोख्या पाहुण्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनी आश्चर्य व कौतुकाने घोरपड बघण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे न्यायालयात घोरपड ही चर्चा सर्वत्र रंगली.
जिल्ह्यात व शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४४.६ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने रस्ते ओस पडले आहेत. या शहराला लागून ताडोबाचे जंगल आहे. या जंगलातील वन्य प्राणी देखील पाण्याच्या शोधात शहरात दाखल होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात चिमणी, पाखरे, कावळे दिसेनासे झाले आहेत. अशा स्थितीत नागरिकांसोबतच वन्यजीव, पशु पक्षी यांचीही पाण्यासाठी धावाधाव होत आहे. अशाच प्रकारची धावपळ एका घोरपडीला देखील करावी लागली आहे. जंगलातून शहरात दाखल झालेली ही घोरपड तीव्र उन्हात पाण्याच्या शोधात थेट जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या कार्यालयात पोहचली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच ग्राहक न्यायालय कार्यालय आहे. तिथे तहानलेल्या व थकलेल्या घोरपडीने पाणी पिऊन तहान भागवली. तहान भागविल्यानंतर ही घोरपड तिथेच चकरा मारत होती. काही वेळाने न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घोरपड दिसली. न्यायालयात घोरपड आल्याची चर्चा सुरू झाली.
त्यानंतर घोरपड बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. न्यायालयातील कर्मचारी यांनी याची माहिती वनविभाग आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना दिली. माहिती मिळताच बंधू धोत्रे यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वन्यजीव मित्रांनी घोरपडीला काळजीपूर्वक पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे निसर्गमुक्त केले.
सुदैवाने कोणतीही हानी न होता घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात यश आले, अशी माहिती इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी दिली.