नागपूर : रेल्वे स्थानकांच्या परिसरातील गुन्ह्यांना आवर घालणे हा रेल्वे प्रशासन पोलिसांच्या अखत्यारितला विषय आहे. सध्या उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीचा धांडोळा घेतला तर रेल्वे स्थानकांवर ६७ हजारांवर गुन्हे नोंदवले गेल्याचे दिसते. त्यातले जवळजवळ एक तृत्यांश १९,८६० गुन्हे हे एकट्या महाराष्ट्रात नोंद झाले आहेत. रेल्वे स्थानकांवर नोंद झालेल्या एकूण गुन्ह्यांची सरासरी काढली तर महाराष्ट्रात रोज ५४ पेक्षा अधिक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडल्याचे आढळले. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर घडणाऱ्या गुन्ह्यांची टक्केवारी ही १५. ८ इतकी आहे. त्या खालोखाल दिल्लीचा गुन्हेगारी दर हा १५.४ इतका आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या तीन वर्षांतल्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास करून सरासरी काढली तर हे निदर्शनास आले आहे. देशात २०२० मध्ये रेल्वे स्थानक आणि परिसरात २९,७४६ गुन्हे नोंदवले गेले. त्यानंतर २०२१ मध्ये ४१,८१६ गुन्ह्यांची नोंद झाली. सरासरीने ही टक्केवारी ४० टक्के वाढल्याचे आढळले. त्यानंतर २०२२ मध्ये ६७ हजार २०४ गुन्ह्यांची रेल्वे पोलिसांनी नोंद घेतली. यातही २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. महाराष्ट्राच्या खालोखाल गुजरात व मध्य प्रदेशमध्येही रेल्वे स्थानकांवर ५,००० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले.
अन्य राज्यांच्या तुलनेत हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरा सारख्या पूर्वेकडील राज्यांत रेल्वेचे जाळे अत्यल्प आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांची संख्याही कमी असली तरी या राज्यांमधील गुन्हे नोंदीचा आकडा स्थिर आहे. तरीही रेल्वे स्थानकांवर वाढणारी गुन्हेगारी ही प्रवाशांसाठीच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातूनही धोक्याची घंटा आहे.
देशात २३ हजार १३९ मृत्यू रुळावर
रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातांमध्ये देशभरात २३ हजार १३९ जणांना प्राण गमवावे लागले. यातील १७ हजार ५३ मृत्यू हे रेल्वेत चढताना, उतरताना अथवा दारात उभे राहून प्रवास करताना तोल जाऊन पडल्याने नोंदवले गेले आहेत. रेल्वेरूळ ओलांडत असताना देशभर दगावलेल्या २ हजार ५६० जणांपैकी १३४० मृत्यू हे एकट्या उत्तर प्रदेशातील असल्याची नोंदही केंद्र सरकारच्या गुन्हे विभागाने घेतली आहे.
नागपूरातील मध्य रेल्वे कार्यक्षेत्राताच्या तुलनेत दक्षिण मध्य पूर्व रेल्वेचे जाळे कमी आहे. सर्वाधिक स्थानकांची संख्या मध्य रेल्वेच्या अखत्यारितला विषय आहे. त्यामुळे निश्चितपणे रेल्वे गुन्ह्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय असली तरी मनुष्यबळ वाढवून गुन्हेगारीला अंकूश लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरज पडेल तेव्हा स्थानिक पोलिसांचीही वेळोवेळी मदत घेतली जाते.
रेल्वे स्थानक गुन्ह्यांची तीन वर्षांतली सरासरी
राज्य- २०२०-२०२१-२०२२- दर
महाराष्ट्र- ११,५०८- १०,२८० – १९,८६०-१५.०८
दिल्ली- २,११७- २,३३१- ३२४२- १५.०४
मध्य प्रदेश-२,०१९- ४५५२- ७६११-८.०९
गुजरात-,१,१६- ६,१११० ५,९९२-८.०९
उत्तर प्रदेश-१४९९- ४१३१- ६,२८६२.७
हरियाणा- ७१८-१३७- १७००-५.७
बिहार- २,०४६-३,७८५- ६,०३०- ५.३
तमिळनाडू-१४२०- १४९५- ३४४५- ४.५
ओडिशा- ७२९-८८१-१५३९- ३.३
आंध्रप्रदेश- ७५४- २०५०- १५२६- २.०९
कर्नाटका-७५६- ९२०-१३५२-२.२
उत्तराखंड- -४४-९७-५६४- ४.९