अकोला : पश्चिम विदर्भातील पहिले ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळावरून हवाईसेवेची प्रतीक्षा कायम आहे. धावपट्टी विस्तार रखडला असून निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबितच आहे. दरम्यान, अस्तित्वातील धावपट्टीवरूनच छोट्या विमानांची हवाईसेवा सुरू करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेण्यात आली.

छोट्या विमानांची सेवा शिवणीवरून सुरू करण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १९४३ मध्ये शिवणी विमानतळाची उभारणी करण्यात आली. विमानतळाच्या १४०० मीटर लांबीच्या धावपट्टीचा विस्तार १८०० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे.

 त्यासाठी आठ वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची एकूण ६०.६८ हेक्टर जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली. धावपट्टीच्या विस्तारासाठी आणखी २२.२४ हेक्टर खासगी भूसंपादनाची आवश्यकता आहे. त्या जमिनीशिवाय विमानतळाचा विकास शक्य नसल्याचे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणने स्पष्ट केले. मात्र, निधीअभावी हे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत शिवणी विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. शिवणीवरून छोट्या विमानांची नवी मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी जोडणारी सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळाच्या देखभाल दुरुस्तीचे काम केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे आहे. विद्यमान धावपट्टीवरून छोट्या विमानांची सेवा सुरू होऊ शकते. त्यासाठी विमान सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांशी संपर्क साधून ही सेवा सुरू करण्याचा मुद्दा खा. धोत्रे यांनी मांडला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विमान कंपन्यांशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘ड्रोन अकादमी’चा प्रस्ताव

अकोल्यातील शिवणी विमानतळावर ‘ड्रोन अकादमी’ सुरू करण्याचा प्रस्ताव देखील केंद्र शासनाकडे देण्यात आला आहे. शैक्षणिक हब म्हणून अकोला शहराची ओळख आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्हे अकोल्याशी जुळले असून असंख्य बाहेरगावचे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे अकोल्यात ‘ड्रोन अकादमी’ उपयुक्त व महत्त्वाची ठरेल, असे खासदार अनुप धोत्रे यांनी बैठकीत सांगितले. यासंदर्भात केंद्र सरकार गंभीर असून मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.