शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येत आहे. त्यांचा निषेध म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्थानिक दत्त चौकात आंदोलन करण्यात आले, तर दुसरीकडे शिंदे गटात सहभागी होऊन मंत्री झालेले संजय राठोड हे सुद्धा आज यवतमाळात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागताला समर्थकांनी अलोट गर्दी केली.दोन्ही नेत्यांबाबत असे विरोधाभासी चित्र असल्याने जिल्ह्यात चर्चा आहे.

शिंदे गटात जाण्यापूर्वी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीने बेजार असलेल्या भावना गवळी गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातून भूमिगत होत्या, असा आरोप या आंदोलनावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतःवरील ‘ईडी’ची कारवाई टाळण्यासाठी शिवसेनेशी गद्दारी करून त्या शिंदे गटात सामील झाल्या. त्या आज यवतमाळला येत आहे. त्यांचा निषेध चपला मारूनच केला पाहिजे, असे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी म्हणाल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना महिला आघाडीच्या समन्वयक सागर पुरी, जिल्हा संघटिका यवतमाळ मंदा गाडेकर, कल्पना दळवी, शहर प्रमुख अंजली गिरी तालुकाप्रमुख संगीता पुरी आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. याचवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक फाडून राठोड यांचा निषेध नोंदवला.

एकीकडे खा. भावना गवळींचा गद्दार म्हणून त्यांच्या प्रतिमेला चपला मारून निषेध होत असतानाच आज यवतमाळात दाखल झालेले शिंदे-फडणवीस सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्या गेल्या. हार, तुरे, ढोल, ताशे, गुलाल आणि चिक्कार गर्दीत शक्तिप्रदर्शन करीत खुल्या जीपमधून रॅली काढत संजय राठोड यांचे स्वागत करण्यात आले. एकाच पक्षातील दोन फुटीर नेत्यांचे झालेले हे स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.