नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली. समाज कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातून केदार गरड पहिला तर वैभव भुतेकर दुसरा आला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली.
‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. लोकसत्ताने याविषयाला वाचा फोडल्यावर आयोगाने याची दखल घेत शुद्धीपत्र जाहीर केले होते. त्यानुसार १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली असून आधी खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणानुसार अर्ज करण्याची संधीही देण्यात आली होती.
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. दोन दिवसापूर्वी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील शेकडो उमेदवारांना यश आले आहे.
अशी केली स्पर्धा परीक्षेची तयारी
वैभव भुतेकर यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी आपल्या गावातच केली. कुठल्याही प्रकारचे क्लासेस त्यांनी लावले नाही. स्वबळावर नियमित अभ्यास, कठोर सराव, नियोजन या त्री सूत्रीच्या मदतीने आज त्यांनी हे यश संपादन केले आहे. यापूर्वी त्याने स्वबळावर विविध स्पर्धा परीक्षाचा यशस्वी सामना केला. वैभव भुतेकर यांची २०२१ मध्ये कर सहाय्यक पदी निवड झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये मंत्रालय लिपिक, अदिवासी आश्रमशाळेवर गृहपाल आणि २०२३ मध्ये त्यांची जालना जिल्ह्यातील वालसा खालसा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक या पदावर निवड झाली होती. सध्या ते वालसा खालसा येथील शाळेवर कार्यरत आहे.
