नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक-टंकलेखन परीक्षेतील सात हजार उमेदवारांचा निकाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला.यात महसूल विभागातील सर्वाधिक पदे आहेत. मात्र, त्यांना अद्यापही नियुक्ती पत्रे मिळालेली नाही. जिल्हा आणि विभागीय स्तरावर शासकीय सोहळा घेऊन नियुक्ती पत्रे देण्यासाठी शासनाने ती अडवून ठेवली आहेत. विशेष म्हणजे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४च्या आधीपासून विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये रूजू होणाऱ्या उमेदवारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शासकीय कार्यक्रम घेऊन नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाते. सरकार विविध विभागांत शासकीय पदांची भरती करून रोजगार देत असल्याचा संदेश समाजात पोहचवणे हा सरकारचा उद्देश असतो.
मात्र, या सगळ्यांमध्ये अनेक महिने उमेदवारांना नियुक्तीच मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सात हजारांवर लिपिक पदे तर ४८६ पेक्षा अधिक कर सहाय्यक पदांसाठी संपूर्ण प्रक्रिया घेण्यात आली. आयोगामार्फत एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा तर विषयांकित पदांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. पात्र उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ४ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत झाली. यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आल्याने निकाल खोळंबला होता.
अखेर ‘मॅट’ने निकाल जाही करण्याचे आदेश दिल्यानंतरही आयोगाने तात्काळ सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यानंतर ११ जुलैला अंतिम निकाल आणि २९ जुलैला शिफारश यादी जाहीर झाली. यानंतर किमान दोन महिन्यात उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळणे आवश्यक होते. यामध्ये महसूल विभागासह कृषी आणि गृह विभागातील पदांचा समावेश आहे. एमपीएससीच्या माध्यमातून पहिल्यांदाच सात हजार पदांवर एकत्रित भरती झाली होती. त्यामुळे उमेदवार चातकासारखी नियुक्तीची वाट बघत आहे.
मात्र, राज्य सरकार शासकीय कार्यक्रम घेऊन नियुक्ती पत्रे वाटप करणार असल्याची माहिती आहे. यासाठी सुरुवातीला १७ सप्टेंबर आणि नंतर २९ सप्टेंबर अशा तारखा ठरवण्यात आल्या. मात्र, २९ तारखेचा कार्यक्रमही समोर ढकलण्यात आला. यासंदर्भात उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लवकर नियुक्ती द्यावी, अशी विनंती केली. ४ ऑक्टोबरला यासंदर्भात कार्यक्रम घेण्यात येणार असून यावेळी सर्व उमेदवारांना नियुक्ती पत्रे त्यांच्या जिल्हा ठिकाणांवर दिली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली.