नागपूर: राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांची दोन हजारांहून अधिक पदे रिक्त असताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नुकत्याच जाहीर झालेल्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत पीएसआय पदांचा उल्लेखही नाही. ही बाब राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे.
‘एमपीएससी’ मार्फत दरवर्षी पीएसआय, राज्य कर निरीक्षक (एसटीआय), आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. आयोगाने काढलेल्या जाहिरातीनुसार, या वर्षी एएसओ पदासाठी तीन जागा आणि एसटीआय पदासाठी २७९ जागा आहेत. एकूण २८२ जागांसाठी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी (२०२४) एकूण ४८० जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती.
या तुलनेत या वर्षी जागांची संख्याही घटली आहे. विद्यार्थ्यांच्या मते, पोलिस दलात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही त्यांचा समावेश जाहिरातीमध्ये न करणे ही सरकारची उदासीनता दर्शवते. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, “एमपीएससी संयुक्त गट ब परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांच्या आशांवर पाणी फिरवणारी ठरली आहे.
पीएसआय सारख्या महत्त्वाच्या पदासाठी एकही जागा नसणे हे योग्य नाही असेही विद्यार्थी म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत २८२ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार असून, ९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
एमपीएससीने याबाबतची माहिती दिली. गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत राज्य कर निरीक्षक या पदाच्या २७९, तर सहायक कक्ष अधिकारी पदाच्या ३ जागा भरण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना १ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. तसेच, चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठीची मुदत २५ ऑगस्ट आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’ने नमूद केले आहे.
उमेदवारांसाठी ‘एमपीएससी’च्या सूचना काय?
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. या परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त या परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे किंवा संवर्ग पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. अशा सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्वपरीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे या परीक्षेमधून भरायच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.