नागपूर : mpsc exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा पुन्हा एक नमुना समोर आलेला आहे. आयोगातर्फे महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा-२०२४ मुख्य उत्तर तालिका जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये तब्बल १२ प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत. तर दोन प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आलेले आहेत. अशा एका एकूण १४ प्रश्नांमध्ये बदल झाल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर मोठा परिणाम होणार असून राज्यातील हजारो विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत. आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २९ जून, २०२५ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा-२०२४, या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका अंतिम केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील, यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या सर्व प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. एमपीएससी सारख्या महत्त्वाच्या संस्थेकडून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्नांमध्ये चुका होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुठे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता राज्यसेवेमध्ये जास्तीत जास्त वीस प्रश्न बदल अथवा कॅन्सल झालेली आहे. त्या खालोखाल आज लागलेल्या उत्तरतालिका मध्ये गट ब मुख्य परीक्षेमध्ये बारा प्रश्न रद्द आणि दोन बदल असे एकूण १४ प्रश्नांची आदलाबदल झालेली आहे.

रद्द झालेले प्रश्न एकूण =12 (5+7)

पेपर एक

मराठी -३

इंग्लिश -२

पेपर-दोन

गणित बुद्धिमत्ता- ३

रिमोट सेन्सिंग -१

भूगोल-१

इतिहास-१

पॉलिटी-१

बदल झालेले प्रश्न –

इंग्लिश =२

परीक्षार्थी उमेदवारांचे आरोप काय ?

आयोगाची अंतिम उत्तरतालिका म्हणजे थोडक्यात अनवधानाने झालेली चूक/प्रिंट मिस्टेक म्हणायची वेळ निघून गेली आहे.

हल्ली कॅन्सल/बदल होणाऱ्या प्रश्नांची संख्या पाहता(राज्यसेवा:२०, गट ब मुख्य :१४) तज्ञांची तज्ञता तपासण्याची वेळ आलीय असे म्हणावे लागेल.

गतिमान आणि पारदर्शकपणाचा आव आणणाऱ्या आयोगाचे तज्ञ जर समोर पुस्तके ठेवून प्रश्न चुकवत असतील आणि त्यातील चुका विद्यार्थी लक्षात आणून देत असतील तर हे घटनात्मक आयोगाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे आहे.

हल्ली अंतिम उत्तरतालिका येईपर्यंत संबंधित परीक्षार्थीस श्वास रोखून वाट पहावी लागते ;मुख्यत्वे ज्यांना पहिल्या उत्तरतालिकेने ज्यांना चांगले गुण आहेत.

रद्द प्रश्नांमुळे होणाऱ्या गुणांच्या उलथापालथीमध्ये मुख्य बळी गुणवत्ता धारकांचा जातोय हे आयोगाच्या लक्ष्यात यायला हवे.

परीक्षेचा अभ्यास करा त्यानंतर चांगला पेपर द्या आणि त्यानंतर आयोगाच्या तज्ञ मंडळींकडून झालेल्या चुकांसाठी मार्केटमधून पुरावे शोधा हे नवीन काम आयोगाच्या तज्ञांनी उमेदवारांना लावले आहे जे की अशोभनीय आहे.

फक्त मुलाकडून नीतिमत्ता चे पेपर घेऊन फायदा नाही आपली नीतिमत्ता आणि आपल्या कामाची नीतिमत्ता सुद्धा जपली पाहिजेय.