आरोग्य विभागावर ताण कायम

नागपूर :  जिल्ह्य़ात करोनाचा प्रकोप शमला आहे. परंतु आता ‘म्युकरमायकोसिस’ने (काळी बुरशी) डोके वर काढले आहे.  जिल्ह्य़ातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत करोनाचे २१० अत्यवस्थ रुग्ण दाखल आहेत, तर त्याहून दुप्पट  म्हणजे ४२८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जिल्ह्य़ात करोनाचे १ हजार १०२ सक्रिय रुग्ण असून त्यातील १ हजार १९ रुग्ण शहरातील तर ८३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांतील २१० विविध रुग्णालयांत उपचार घेत असून ८९२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्य़ात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे एकूण १ हजार ४७५ रुग्ण आढळले. त्यातील १ हजार ७२ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून ९१६ रुग्णांना रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली. सध्या शासकीय रुग्णालयांत २६४, खासगी रुग्णालयांत १६४ असे जिल्ह्य़ात  एकूण ४२८ अत्यवस्थ  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयांत दाखल करोनाबाधितांच्या तुलनेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण दुपटीहून अधिक असल्याने आरोग्य विभागावर ताण कायम आहे.

पूर्व विदर्भातील ७८ टक्के दाखल रुग्ण नागपुरात

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत म्युकरमायकोसिसचे ५४६ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. त्यातील ७८.३८ टक्के म्हणजे ४२८ रुग्ण नागपूर जिल्ह्य़ातील आहेत.  इतर ११८ रुग्ण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या चार जिल्ह्य़ांतील विविध रुग्णालयांत दाखल आहेत. गडचिरोलीत अद्याप या आजाराचा एकही रुग्ण नाही.

प्रशासनाच्या यशस्वी नियोजनातून करोनाचे रुग्ण जिल्ह्य़ात कमी झाले असून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयांत आवश्यक सोय केली आहे. या रुग्णालयांत वेळोवेळी आवश्यक औषधे, इंजेक्शनसह इतरही साहित्याचा पुरवठा केला जात आहे. करोनाप्रमाणे लवकरच म्युकरमायकोसिसचेही रुग्ण यशस्वी उपचारातून बरे होतील.

डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mucormycosis patients double compare to corona in various hospitals of nagpur zws
First published on: 21-06-2021 at 05:13 IST