अकोला : सणासुदीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला असून मुंबई-नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेद्वारे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाडी सोडण्यात येईल. दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. विशेष गाडी क्र. ०१००५ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २५ ऑक्टोबरला ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्र. ०१००६ नागपूर येथून २५ ऑक्टोबर रोजी १८.१० वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावल, मलकापुर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा येथे थांबा राहील. २० तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन अशी गाडीची संरचना राहील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
अमरावती-पुणे-अमरावती विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या
सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष गाडी सोडण्यासह काही नियमित गाड्यांच्या फेऱ्यात देखील वाढ केली. प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती – पुणे – अमरावती (गाडी क्रमांक ०१४०४/०१४०५ ) ही एक विशेष गाडी ८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान आठ फेऱ्या (दर बुधवार) चालविण्यात येत आहे. भुसावळ विभागातून एकूण एक हजार ४६४ विशेष सेवा चालवल्या जात आहेत. या गाड्या नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला आणि बडनेरा आदी प्रमुख स्थानकांवर थांबतात. आतापर्यंत भुसावल विभागातून ५४४ विशेष गाड्या चालवल्या गेल्या आहेत.
विनाअडथळा प्रवासाचे नियोजन
रेल्वेच्या भुसावळ विभागात परिचालन, वाणिज्य, सुरक्षा आणि अभियांत्रिकी विभागाने समन्वय साधून सणासुदीच्या काळातील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि तणावरहित प्रवास अनुभवता येण्यासाठी विभागाचे प्रयत्न आहेत. सर्व विभागांच्या समन्वय, नियोजन आणि सूक्ष्म देखरेखीमुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित प्रवास अनुभव येणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला. रेल्वेच्या नियोजनामुळे प्रवाशांना गर्दीच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.