नागपूर : कोणताही राजकीय पक्ष निवडणुका तोंडावर असेल तर कार्यकर्त्यांचे , नेत्यांचे मनोबल उंचावून, त्यांच्यात ऊर्जानिर्माण करून निवडणुका कशा जिंकता येईल यासाठी प्रयत्न करीत असतो, स्थानिक नेतृत्वावर अविश्वास असला तरी त्याला सोबत घेऊनच पुढचे पाऊल टाकले जाते. त्याला बदलले जात नाही. विशेषत: निवडणुका जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या असेल तर असे करणे हे धोकादायक ठरते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा धोका राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पक्षाच्या शहर अध्यक्षांची तडकापडकी उचलबांगडी करून पत्करला आहे. यामुळे मुळातच शक्तीहिन असलेल्या त्यांच्या पक्षाचे अस्तित्व महापालिकेत शिल्लक राहते किंवा नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर ही राज्याची उपराजधानी असूनही, राष्ट्रवादी काँग्रेस येथे पक्षाच्या स्थापनेपासूनच मजबूत पकड निर्माण करू शकली नाही. २००२ मध्ये या पक्षाने महापालिका निवडणुकीत ११ जागा जिंकत काहीसा प्रभाव दाखवला, परंतु त्यानंतर त्याचा प्रभाव सतत कमी होत गेला. दत्ता मेघे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला थोडेसे बळ मिळाले होते. मेघे यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रभाव आणि लोकसंपर्कामुळे काही प्रमाणात पक्ष वाढू शकला. पण मेघे यांच्या पक्ष त्यागानंतर नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले. मेघे यांच्या नंतर नेतृत्व अनिल देशमुख व प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गेले. मात्र, देशमुख यांचे नेतृत्व काटोल मतदारसंघापुरते मर्यादित राहिले. पटेल यांचा नागपूरमध्ये फारसा रस नसल्यामुळे पक्ष बळकट होऊ शकला नाही. परिणामी, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली. आता तर पक्षच दुभंगला आहे. त्यामुळे आहे ती शक्तीही विभागली गेली आहे. आज, नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अस्तित्वच संकटात आहे. नेतृत्वात सातत्याचा अभाव, प्रभावशाली स्थानिक नेतृत्वाचा अभाव, आणि निवडणूकपूर्व निर्णयातील अस्थिरता यामुळे या पक्षाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
प्रशांत पवार यांची कारकीर्द
२०२३ मध्ये अजित पवार यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यावर, नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी प्रशांत पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी पक्षाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. पक्ष रस्त्यावर उतरवला, कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. भाजपबरोबर तडजोड न करता, स्वाभिमानी भूमिका घेतली. त्यांनी ४० जागांची मागणी करून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी पुन्हा एकदा व्यवसायिक पार्श्वभूमीचे अहिरकर यांना शहराध्यक्ष बनवण्यात आले. यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. पक्षाच्या आतल्या गटबाजी व नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले.
उचलबांगडी अंगलट ?
ऐन महापालिकेच्या निवडणुका समोर असताना शहर अद्यक्षाला बदलणे हे राष्ट्रवादीच्या अंगलट येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. पवार यांच्या जागेवर अहिरकर यांना अध्यक्ष करण्यात आले आहे, ते यापूर्वी अनेक वर्ष या पदावर कार्यरत होते. मुळ व्यावसायिक असणाऱ्या अहिरकर यांचा पक्षाच्या विस्तारात काहीच फायदा झाला नाही, एका चौकटीतच हा पक्ष होता. पवार यांनी ही चौकट मोडून कार्यकर्त्यांना वेळ देणे, त्यांच्यासाठी काम करणे सुरू केले होते. प्रत्येक प्रभागात त्यांनी उमेदवारचा शोध सुरू केला होता. विविध आघाड्यांची स्थापना करून त्यानी पक्षविस्ताराचे प्रयत्न केले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवार यांना दूर केल्याने पक्षातील एक वर्ग नाराज आहे.