वर्धा : रागाच्या भरात कोणते कृत्य हातून घडेल याचा नेम नसतो, असे म्हटल्या जाते. त्यात युवकांचे उसळते रक्त असेल तर रागाचे पर्यवसान घातक घटनेत होणे अटळ. या प्रकरणात तसेच झाले आहे. तिशीतील दहा युवक खुनाच्या घटनेत आरोपी असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी घडलेली ही खुनाची घटना आहे. देवळी तालुक्यातील तांभा येंडे येथील गोलू धनराज कुंभरे (२८) असे मृतकाचे नाव आहे. गोलू याने त्याचा मित्र अमोल सलामे याची दुचाकी काही दिवस वापरण्यासाठी आणली होती. मात्र त्याला आर्थिक अडचण आल्याने त्याने ती गाडी गुड्डू दाबेकर रा. यवतमाळ याच्याकडे गहाण ठेवून १० हजार रुपये उचलले. मात्र सतत मागणी करूनही गाडी परत मिळत नसल्याने मित्र अमोल याने शेवटी सावंगी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ही गहाण असलेली गाडी ताब्यात घेत ती अमोल यांस परत केली.
इकडे गहाण ठेवून घेतलेले १० हजार रुपये वापस मिळत नाही म्हणून अनुप दाबेकर याचा राग वाढत चालला होता. गावात जात त्याने गोलुचे घर गाठले. पैश्याची मागणी केली. ते मिळत नाही म्हणून मग अनुपने गोलूस गावाबाहेर नेले. कोठा गावातील तलावाजवळ आणले. या ठिकाणी गोलूस मारहाण करण्यात आली. अनुपचे मित्र अनिकेत काकडे, सुरज बांधबुचे, विजू येडमे, धन्नू कोल्हे, अविनाश भोयर, शुभम टेकाम यांनी मिळून गोलूस पावडा, बेल्ट, लाथाबुक्क्याने मारहाण केली. या बेदम मारहाणीतच गोलुचा मृत्यू झाला. ते पाहून मग आरोपीनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. हा मृतदेह खर्डा शिवारात वर्धा नदीच्या कालव्यात फेकून देण्यात आला. तसेच रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकण्यात आले. १० मे रोजी या प्रकरणी गोलू हरवील्याची तक्रार दाखल झाली होती. पुढे नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. चौकशीत हा खून उघडकीस आला.
या प्रकरणात धन्नू कोल्हे, अविनाश भोयर, शुभम टेकाम या तिघांना अटक झाली असून उर्वरित फरार आहेत. पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण, देवळीचे ठाणेदार रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक कल्पेश मगरे, सहाय्यक फौजदार दीपक जाधव तसेच मनोज कांबळे, कुणाल हिवसे, नितीन तोडासे, संदीप बोरबन,रामदास दराडे, उमेश बेले यांच्या चमुने ही कारवाई यशस्वी केली.