– मोहन अटाळकर

अमरावती : एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांगापूर फाट्याजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. युवकाच्या हत्येनंतर आरोपीने स्वत:वर चाकूचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सचिन विजयराव खरात (३२) रा. नवसारी असे हत्या करण्यात आलेल्या मृत युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी असलेल्या राजेश पंडीतराव बेलोकार (३२) रा. सोनोरी. ता. चांदूर बाजार याने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी स्वप्निल ठेंबरे रा. नवसारी याच्या तक्रारीवरून राजेश बेलोकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत सचिन खरात या युवकाचे अमरावती येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती या महिलेचा दुसरा प्रियकर असलेल्या राजेश बेलोकार याला मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या राजेशने सचिन खरात यास चांगापूर फाट्याजवळ चर्चा करण्यासाठी बोलावले.

सचिन खरात हा त्याच्या स्वप्निल ठेंबरे नामक मित्रासह चांगापूर फाट्यावर राजेशला भेटायला गेला. त्या ठिकाणी राजेशने त्या महिलेसोबतचे सबंध संपव असे म्हणत सचिनला दम दिला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संबंधित महिला सुध्दा चांगापूर फाटा येथे पोहचल्याने राजेशचा संताप अनावर झाला. त्याने सचिनवर चाकूने हल्ला केला, त्यात सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर राजेशनेही स्वत:च्याच अंगावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

हेही वाचा : चार राज्यात ३५ गुन्हे दाखल असलेला कुख्यात आबू अखेर अटकेत, वेश बदलून नागपूर पोलिसांची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणी सचिनसोबत असलेल्या स्वप्निल ठेंबरे नामक युवकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी राजेश बेलोकार याला ताब्यात घेवून, त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.