Muslim View on RSS नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लीम विरोधी असल्याचा आरोप अनेकदा संघावर टीका करणाऱ्यांकडून केला जातो. संघ ही केवळ हिंदूंची संघटना असून हिंदू राष्ट्र करणे या संघटनेचा उद्देश असल्याचाही आरोप होतो. मात्र नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा मोठा उत्साहात साजरा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त नागपूरमधील गड्डी गोदाम परिसरात काल संघात स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. या पथसंचलनात अनेक मुस्लिम स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी दिलेले प्रतिक्रिया ही टीकाकारांना सडेतर उत्तर देणारी ठरली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागपूर शहरातील विविध भागांमध्ये संघाचे पथसंचलन आयोजित केले जात आहे. नागपूरच्या गड्डीगोदाम भागात निघालेल्या पथसंचलनामध्ये एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. ढोलताशांच्या गजरात भगव्या पताका हाती घेऊन गणवेशात पथसंचलन करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये काही मुस्लिम स्वयंसेवकही पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

नेमके काय म्हणाले मुस्लिम स्वयंसेवक

या मुस्लिम स्वयंसेवकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, “संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वयंसेवकांच्या मध्ये वावरल्यानंतरच कळू शकतं.” बहुतांशी मुस्लिम संघापासून मुस्लिम विरोधी असल्याच्या गैरसमजातून दूर राहतात, मात्र काही मुस्लिम खुल्या दिलाने संघाच्या विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि स्वयंसेवकांसोबत वावरल्यानंतरच संघाची खरी भूमिका समजते, असे या स्वयंसेवकांनी सांगितले.

नमाज पडण्यासाठी दिली जाते वेगळी खोली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तर रेशीमबाग परिसरात पहिले सरसंचालक डॉक्टर हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजी यांची समाधी आहे. त्यामुळे हे ठिकाण जगभरातील स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान आहे. या परिसरात संघाचे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमध्ये अनेक मुस्लिम स्वयंसेवक ही सहभागी होतात. यासंदर्भात पथसंचलनात सहभागी झालेल्या मोहम्मद आसिफ नावाच्या एका मुस्लिम स्वयंसेवकाने सांगितले की, आम्ही संघाच्या शाखेत अनेक वर्षांपासून जातो.

रेशीमबागमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतो. यावेळी आम्हाला कधीही भेदभावाची वागणूक दिली जात नाही. तसेच आम्हाला नमाज पडण्यासाठी कुठलेही बंधन नाहीत. रेशीम बागेमध्ये नमाज पडण्यासाठी एक वेगळी खोली दिली जाते. त्यामुळे आमच्या कोणत्याही धार्मिक उपक्रमांवर संघाकडून कधीच बंधन लादली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी कधीही मुस्लिम समाजाचा द्वेष केला नाही. ज्यांचा धर्मावर विश्वास असेल त्यांनाच खरा संघ समजेल असेही ते म्हणाले.