चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘जीपीएस टॅग’ लावून सोडण्यात आलेल्या ‘एन-११’ या मादी गिधाडाने चक्क पाच राज्यांतून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले. मात्र, तेथे विजेच्या स्पर्शाने गुरुवारी गिधाडाचा मृत्यू झाला.

तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील थिरुमयम रेंजजवळ विजेची तार ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना विजेचा धक्का लागून गिधाडाचा मृत्यू झाल्याचे बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. थिरुमयम रेंजच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मृत गिधाडाला ताब्यात घेतले आणि सहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकाने उत्तरीय तपासणी केली. त्याचा अहवाल लवकर दिला जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा…छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…

‘जीपीएस टॅग’ लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या या गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला होता. किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड तामिळनाडूतील कलसपाक्कम या तालुक्यात पोहोचले होते. तिथून ते समोर जात होते. निसर्गचक्रात, देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी ‘बीएनएचएस’ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरिणायातील पिंजोर येथे ‘बीएनएचएस’ने एक गिधाड प्रजनन केंद्र उभारले. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे ठेवण्यात आली होती. त्यांना ताडोबा येथील जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पाठीच्या गिधाडांंना ‘जीपीएस टॅग’ लावून ऑगस्ट महिन्यात ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते.

यामधील ‘एन-११’ या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू, असा प्रवास केला. ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० कि.मी. अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले होते. तेथे त्याच्यावर उपचार करून सप्टेंबरमध्ये पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत या गिधाडाने गुजरात गाठले. यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले होते. नंतर गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले सापडले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला.

हेही वाचा…केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गिधाड फिरले. ‘एन-११’ या गिधाडाच्या ताडोबा ते गुजरात या स्थलांतरादरम्यान त्याला दोन वेळा पकडून पुन्हा सोडावे लागले होते. मात्र, गुजरात ते तामिळनाडू या प्रवासादरम्यान त्याला एकदाही पकडावे लागले नाही. दरम्यान, या गिधाडाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.