वर्धा : नगर पालिका निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षात उत्साह संचारला. मात्र आघाडी घेतली ती भाजपने. घोषणा होण्यापूर्वीच भाजपने प्रदेश प्रतिनिधी पाठवून संभाव्य उमेदवारांची चाचणी आटोपली होती. त्यानुसार क्रमवारी लावली. निवडणूक घोषणा झाल्यानंतर मग भाजपने कोअर ग्रुप स्थापन करीत ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या. त्यात एक अडचण आली होती. या ग्रुपमध्ये राहण्यास सर्वच आमदारांनी विरोध दर्शविला होता. कारण ईच्छुकपैकी काहींचे समर्थन करीत उर्वरितांची नाहक नाराजी कशाला, असा त्यांचा पेच होता. मात्र स्थानिक नेते आमदार हवेच, आम्ही पण नाराजी कां ओढवून घ्यायची, या भूमिकेत आले. शेवटी मुंबई दरबारी हे प्रकरण गेले. तोडगा निघाला. ज्या शहरातील मुलाखत असेल त्यावेळी संबंधित आमदार गैरहजर राहणार.

दिवसभर जिल्ह्यातील सहाही पालिकेच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. इच्चूकांची भाऊगर्दी असल्याने प्रथम तीन नावांचे पॅनल करण्यात आले. जिल्हा निवडणूक प्रमुख माजी खासदार रामदास तडस व पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर हे प्रभारी म्हणून कोअर गटात आहे. तसेच आजी माजी जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, जिल्हा सरचिटणीस यांचा पण या गटात समावेश आहे. मिळून सर्वांनी तीन नावावर शिक्कामोर्तब केले. आता याच नावातून एक नगराध्यक्षपदाचा भाजपचा उमेदवार ठरणार. त्याची घोषणा प्रदेश समिती मुंबईतून करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सत्ताधारी असल्याने भाजपचा उमेदवार कोण, याची राजकीय वर्तुळत कमालीची उत्सुकता दाटून आली आहे. गोपनीय सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार अशी तीन नावे निश्चित झाली आहे. त्यातून एक निवडणूक लढणार, हे पक्के.

वर्धा नगराध्यक्षपद ओबीसी राखीव आहे. यासाठी नीलेश किटे, प्रदिपसिंह ठाकूर व प्रशांत बुरले ही तीन नावे पक्की झाली. देवळी खुल्या गटासाठी आहे. शोभाताई रामदास तडस, नरेंद्र मदणकर व नंदू वैद्य. आर्वी खुल्या वर्गातील महिला राखीव. योगिता केचे, दीपा मोटवानी व स्नेहल शिंगाणे. हिंगणघाट खुल्या गटातील महिला प्रवर्ग. जया प्रेम बसंतानी, नयना उमेश तुळसकर व छाया सातपुते. सिंदी खुल्या गटातील महिला प्रवर्ग. अर्चना गवळी, राणी कलोडे व पुष्पा कोपरकर. पुलगावचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव आहे. त्यासाठी ममता बडगे, पूनम सावरकर व मंगला निवल या तिघींच्या नावाची शिफारस प्रदेश समितीकडे करण्यात आली आहे. सहाही नगर पालिकांचे भाजप उमेदवार या तीनपैकीच एक राहणार. या विषयी मत व्यक्त करण्यास कोअर समितीच्या एकाही सदस्याने होकार दिला नाही. मात्र नाव नं देण्याच्या अटीवर यांस दुजोरा दिला आहे.