नागपूर : शहरातल्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळीत आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. तब्बल १३० वर्ष जुनी मोडकळीस आलेली भिंत अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत परिसरात उभ्या असलेल्या ३ कार भिंतीखाली दबल्या. भिंत पडत असताना येथून दुचाकी जात होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला. त्याचा व्होडिओ आता पुढे आला आहे. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील एम्प्रेस मिल परिसरातील घटनास्थळी भिंत कोसळताना एवढा मोठा आवाज झाला की, परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. क्षणभर गोंधळ उडाला, धूळ-धूर भरला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. कार मालकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या वाहनांचे अक्षरशः लोखंडी कचऱ्यात रूपांतर झालेले दिसले. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला. मात्र मनुष्यहानी टळल्याने सर्व उपस्थितांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान भिंत पडत असतांनाच येथून दुचाकी जात होती. ती भिंतीपुढे जाताच भिंत कोलमडून पडली. त्यामुळे दुचाकी स्वार बचावला.

स्थानिकांच्या मते, ही भिंत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होती. वारंवार पावसाच्या तडाख्यामुळे ती अधिकच कमकुवत झाली होती. शेवटी ही भिंत कोसळली. दरम्यान नागपूर महापालिकेने याआधीही नागपूर शहरातील जीर्ण इमारतींबाबत वारंवार संबंधित नागरिकांना इशारे दिले होते, तरी अनेक ठिकाणी अशा धोकादायक रचना अजूनही उभ्याच आहेत. एम्प्रेस मिल परिसरातील कार मालकांचे आर्थिक नुकसान झाले असले तरी जीव वाचल्यामुळे हा परिसर ‘मोठा अपघात थोडक्यात टळला’ असे म्हटले जात आहे. या घटनेनंतर नागपूर महापालिका जीर्ण इमारतीचा विषय कश्या पद्धतीने हाताळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नागपुरात जीर्ण इमारतीची स्थिती काय ?

महापालिकेच्या जून महिन्यातील अहवालानुसार, नागपूरमध्ये २४१ जीर्ण इमारतींपैकी तब्बल ५१ इमारती अतिधोकादायक आहेत. यापैकी मोठ्या संख्येने इमारती गांधीबाग आणि मंगलवारी भागात आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, धोकादायक इमारती किंवा भिंतींच्या परिसरात वास्तव्य करणे टाळावे, कारण जीवितहानीचा मोठा धोका आहे. आज एम्प्रेस मिल परिसरात घडलेली घटना या इशाऱ्याचाच पुरावा ठरली.

जीर्ण इमारत म्हणजे काय ?

जीर्ण इमारत  म्हणजे अशी इमारत जी इतकी जीर्ण झालेली आहे किंवा इतकी खराब झाली आहे की तिची ताकद किंवा स्थिरता नवीन इमारतीपेक्षा खूपच कमी आहे, किंवा ती जळण्याची किंवा कोसळण्याची शक्यता आहे आणि ज्याची स्थिती जनतेच्या जीवनाला, आरोग्याला, सुरक्षिततेला किंवा मालमत्तेला धोका निर्माण करते.