नागपूरः कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात गुरुवारी शिंगाडा पिठाची पुरी आणि बटाटा भाजीचे सेवन केल्यावर २५ ते ३० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या सगळ्यांना तत्काळ नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

कोराडी देवस्थानातील स्वयंपाकगृहात गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी शिंगाडा आणि राजगिराच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी तयार केली होती. येथील कर्मचाऱ्यांसह इतर सुमारे २५ ते ३० जणांनी या खाद्यपदार्थांसह लाडूचेही सेवन केले. त्याच्या काही तासांनी सगळ्यांना अचानक ओकारी, थंडी, भोवळचा त्रास सुरू झाला. सगळ्यांची प्रकृती खालावत असल्याचे बघत तातडीने सगळ्यांना जवळच्या नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी रुग्णांचा इतिहास घेत तातडीने सगळ्यांवर उपचार सुरू केले. येथील डॉक्टरांशी गुरुवारी रात्री ८ वाजता भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता आतापर्यंत सुमारे २६ रुग्ण उपचारासाठी आले असून आणखी रुग्ण येणे सुरू असून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचाही डॉक्टरांचा दावा आहे.

हेही वाचा – विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा

नागपुरात गेल्या दीड महिन्यात सातत्याने विषबाधेचे प्रकरण घडत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहे. या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता अद्याप कसलीही तक्रार आली नसल्याचा दावा करण्यात आला.

हेही वाचा – विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…

”फराळातून अतिशय किरकोळ स्वरुपाची विषबाधा झाली. सर्वांवर आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचार केले. सगळेच सुखरूप आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. काही कामावरही परतले आहेत.” – व्यवस्थापक, श्री. महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी.