लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : ‘आयएएस’ किंवा ‘आयपीएस’ अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका निरीक्षकाने नैराश्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथील खोली नं. ३११ मध्ये घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली हे.
शुभम सिद्धार्थ कांबळे (२५) (रा. गंगाखेड, परभणी) असं मृत तरूणाचं नाव आहे. त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. आई-वडील शेती करतात. अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमात पदवीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. शुभम हा अन्न व औषधी प्रशासन विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होता. सुशिक्षित कुटुंबातील असलेल्या शुभमला ‘आयएएस’ किंवा ‘आयपीएस’ अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्याने तयारीही केली. मात्र, तो यशस्वी झाला नाही. हताश झाल्याने २४ नोव्हेंबरला तो घरून निघाला. रात्र होऊनही घरी परतला नाही. आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. मित्र, नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. त्यामुळे गंगाखेड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली.
दरम्यान, शुभम २५ नोव्हेंबरला मित्राला भेटायला नागपूरला आला. सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथे थांबला. तिकडे गंगाखेड पोलीस शुभमचा शोध घेत होते. पोलिसांनी शुभमचे लोकेशन मिळवून तो राहात असलेल्या ठिकाणचा पत्ताही मिळवला. गंगाखेड पोलिसांनी २७ नोव्हेंबरला हॉटेल राजहंस येथे फोन करून विचारपूस केली. हॉटेलचे व्यवस्थापक दिलीप बावणे (४५) रा. गांजाखेत यांनी तेथील कर्मचाऱ्याला खोली नं. ३११ मध्ये पाठवले. खोलीचे दार बंद असल्याने त्याने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. व्यवस्थापक बावणे यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडून पाहिले असता शुभम बेडवर बेशुद्धावसथेत पडून होता. जवळच चार ते पाच काही रसायनाच्या बाटल्याही पडून होत्या. त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कुटुंबातून कुणीतरी अधिकारी व्हावा
शुभमने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांच्या आणि पोलिसांच्या नावे पत्र लिहिले. ‘मला आयएसएस, आयपीएस अधिकारी होता आले नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. कुटुंबातील एकाला तरी प्रशासकीय अधिकारी बनवा’, अशी इच्छा शुभमने व्यक्त केली आहे. तसेच आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही म्हटले आहे.