नागपूर : राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरण गाजत असून यामध्ये राज्यातील ७२ आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते अडकल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर सरकारकडून फारसे काही बोलणे टाळून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असताना या वादात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते यांनी उडी घेतली आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोलेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ना हनी- ना ट्रॅप ‘असे उत्तर दिले होते. मात्र हा विषय काही संपता संपत नाही. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी त्यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे.

हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, इतके मोठे हे प्रकरण आहे. त्यात खूप मोठी मोठी माणसे अडकली आहेत. त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावे लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री धडधडीत विधानसभेत खोटे बोलले, असे वक्तव्य केले. त्या आईचे अश्रू सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री समजू शकत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी काल दिलेले भाषण हेच खोटे होते, हे स्पष्ट होत आहे. मी अनेकदा सांगितले आहे की, महाराष्ट्रातले काही वरिष्ठ अधिकारी, मंत्री या हनी ट्रॅपमध्ये आहेत. त्याचे केंद्रबिंदू नाशिक, ठाणे आणि मुंबई आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण दस्तऐवज या हनी ट्रॅपमुळे असामाजिक तत्त्वांच्या हाती गेले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहे. मी पेन ड्राईव्ह दाखवला त्यावेळेस अध्यक्षांनी मला नको नको नको, ते आपल्याकडेच ठेवा, असे म्हटले. त्यावेळेस माझ्याकडे पेन ड्राईव्ह मागितला असता तर मी देऊन टाकला असता. ते आम्हाला जाहीरपणे दाखवता येणार नाही. कारण, अनेक कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त होतील. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कारण त्यांच्याजवळ देखील याबाबत माहिती असेल. पण. मुख्यमंत्री हे का लपवत आहे? महाराष्ट्राचे नुकसान का करत आहे? असा सवाल पटोले यांनी केला.