नागपूर : नागपूरहून अहमदाबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे नागपूर विमानतळावर परत उतरावे लागले. ही आपत्कालीन लँडिंगची घटना प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली.

इंडिगो एअरलाइन्सचे विमान क्रमांक ६ई७२४६ ने मंगळवारी सकाळी ८.१० वाजता नागपूरहून अहमदाबादकडे उड्डाण केले. मात्र काही वेळातच कॉकपीटमध्ये तांत्रिक समस्या जाणवू लागल्याने वैमानिकाने तात्काळ निर्णय घेऊन विमान परत नागपूरकडे वळवले. विमानाने सकाळी ८.५० वाजता सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर लँडिंग केले.

विमानात ७८ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. विमानतळ प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवून सर्व प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कॉकपीटमध्ये तांत्रिक समस्या आढळून आल्याने वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून विमान माघारी आणण्यात आले. याप्रकरणी सर्व आवश्यक तपासणी सुरू आहे, असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर प्रवाशांना पुढील उड्डाणासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.