नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख आहे. नागपुरातील सुरेश भट सभागृहात शनिवारी (२ ऑगस्ट २०२५) झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुद्धीबळ आणि राजकारण याच्याशी संबंधित एक महत्वाचे भाष्य केले. मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील सुरेश भट सभागृहात शनिवारी महाराष्ट्र शासनातर्फे ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा विश्वविजेती झाल्याबद्दल नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, दिव्या देशमुख हिने बुद्धीबळ स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकून भारताचे नाव जगभरात कोरले. हा नागपूर, महाराष्ट्रासह देशाचा गौरव आहे. दिव्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला गेला. सदर बैठकीत दिव्याचे अभिनंदन करतांना आम्हाला कसा सन्मान मिळतो त्याचेही उदाहरन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस सत्कार समारंभात पुढे म्हणाले, मंत्रीमंडळ बैठकीत दिव्याच्या अभिनंदनाच्या प्रस्तावादरम्यान आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ मिश्किलपने म्हणाले नागपुरातील लोकांची बुद्धीमत्ता जास्तच आहे. त्यामुळे बुद्धीबळात ते जास्तच गतीमान आहे. आम्ही राजकारणीही बुद्धीबळ खेळतो. परंतु राजकारणाचे बुद्धीबळ खेळतो. आमच्याही खेळात नाॅक आऊट, चेक मेट केले जाते. त्यानंतर फडणवीस पुढे म्हणाले, दिव्याने बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेतेपदाचे जे यश मिळवले, त्यामुळे तिच्या नागपुरातील सत्कारातून सगळ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात खेचल्यास सर्व मदत करणार जागतिक बुद्धीबळ स्पर्धेची स्पर्धा महाराष्ट्रात खेचण्याचे प्रयत्न संघटनेकडून सुरू आहे. त्यात यश मिळाल्यास शासनाकडून सर्व मदत केली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दिव्या देशमुखबाबत…
नागपूरची ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने गेल्या २३ जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या. उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.