नागपूर : एका शाळकरी मुलीशी ऑटोचालक बळजबरी अश्लील चाळे करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या प्रकारानंतर पालक वर्गांत खळबळ उडाली होती तसेच संतप्त प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर येत होत्या. शेवटी अजनी पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करीत ‘त्या’ ऑटोचालकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. विशाल जयराम देशमुख (२७, दिघोरी) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी अजनीतील ग्रीन प्लॅनेट कॉलनी, ओंकारनगरातील रस्त्याच्या कडेला एका ऑटोत नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीशी ऑटोचालक अश्लील चाळे करीत होता. ती मुलगी वारंवार विनवण्या करूनही ऑटोचालक बळजबरी करीत होता. हा सर्व प्रकार एका महिलेने घराच्या खिडकीतून मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. ती चित्रफीत कॉलनीच्या एका व्हॉट्सअ‍ॅप समुहावर टाकली. मात्र, काही तासांतच ही चित्रफीत शहरभर प्रसारित झाली. अनेक पालकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून ऑटोचालकाचा शोध घेण्यास सांगितले होते.

हेही वाचा – वाघीण आपल्या बछड्यांसह भुयारी मार्गातून जाते तेव्हा… ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर…

हेही वाचा – वन्यजीवतस्करांच्या मुसक्या आवळणार ‘हा’ सायबर सेल; जाणून घ्या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजनी पोलिसांनी जवळपास शंभरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजवरून ऑटोचालक विशाल देशमुखला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ऑटोचालक विशालनेच अश्लील चाळे केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी मुलीच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे अजनी पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून ऑटोचालक विशाल देशमुखला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.