Solar Explosives Company Explosion Nagpur : नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत बुधवारी झालेल्या स्फोटांनंतर पुन्हा एकदा कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यात एक कामगार मृत्युमुखी पडला असून १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटाने दोन वर्षांपूर्वी याच कंपनीत झालेल्या स्फोटाची आठवण झाली आहे. २०२३ मध्येही याच कंपनीत मोठा स्फोट झाला, ज्यात नऊ कामगारांना जीव गमवावा लागला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते.

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील ‘सोलर एक्सप्लोझिव्ह’ कारखान्यात डिसेंबर २०२३ मध्ये सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात नऊ जण ठार झाले. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि रसायने असल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. या स्फोटात तीन जण जखमी झाले. तर जून २०२४ मध्ये देखील या कंपनीत झालेल्या स्फोटात चार कामगार गंभीर जखमी झाले होते.

हा कारखाना सोलर एक्सप्लोरेशन कंपनीचे मालक उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांचा आहे. ही कंपनी देशातील अनेक कंपन्यांना दारूगोळा पुरवते. संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही कंपन्यांनाही दारूगोळा पुरवते. कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जातात. स्फोटाच्या वेळी कारखान्यात दारूगोळा तयार केला जात असल्याचे सांगण्यात आले. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की या स्फोटामुळे केसीबीएच-२ ची एक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. युवराज किशनजी, ओमेश्वर किसनलाल, मीता प्रमोद उईके, आरती नीलकंती सहारे, स्वेतली दामोदर मारबते, पुष्पा रामजी, भाग्यश्री सुधाकर, रुमिता विलास उईके आणि मोसम राजकुमार अशी मृतांची नावे होती.

बुधवारी झालेल्या स्फोटदेखील भयंकर होता. स्फोटामुळे कंपनीच्या परिसरातील इमारतीं कोसळल्या. त्याच्या ढिगाऱ्याखाली कैलाश वर्मा व मनीष वर्मा दबल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायावर इमारतीचा लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि शेवटी त्यांना पाय गमवावे लागले. स्फोट इतका भीषण होता की दहा किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज पोहचला. स्फोटात दगावलेल्या कामगाराच्या शरीर लोखंडी सळ्यांचे तुकडे शिरले होते तर टीन पत्र्यांमुळे दोन कामगारांना त्यांचे पाय गमवावे लागल्याची माहिती आहे. स्फोटात दगावलेल्या कामगाराचे नाव मयूर गणवीर आहे. स्फोटानंतर कंपनी परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले.