पर्यावरणाच्या आणि पर्यायाने आरोग्याच्या अनुषंगाने नागपूरकर जागरूक होत आहेत, म्हणूनच शहराच्या विकासाला विरोध नाही. पण, विकासाची घाई आणि होणारी परवड यामुळे नागरिक व्यक्त होऊ लागले आहेत. शहरात सध्या मेट्रो रेल्वे आणि रस्त्यांचे सिमेंटीकरण या दोन विकासात्मक गोष्टी वेगाने होत आहेत. त्यातील रस्त्याच्या सिमेंटीकरणावर किंबहुना त्यामुळे होणाऱ्या परिणामांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाज माध्यमांच्या युगात नागपूर महापालिकासुद्धा ‘हायटेक’ झाली. समाज माध्यमांचा वापर करत त्यांनी विकास कामांची जंत्री नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. शहराच्या विकासात भर घालणाऱ्या रस्ते सिमेंटीकरणाचे त्यांनी तोडभरून कौतुक त्यांच्या ‘स्मार्ट नागपूरकर’ या फेसबुक पानावर केले. मात्र, हे रस्ते सिमेंटीकरण त्यांच्यावरच उलटले. रस्ते सिमेंटीकरणाने शहराच्या तापमानात भर होणार हे निश्चित आहे. अनेक अभ्यासकांनी ते पर्यावरणदृष्टय़ा समजावून देखील सांगितले आणि पर्यावरणाविषयी नागरिकांनाही जाण आहेच. त्यामुळे रस्ते सिमेंटीकरणाचा ढोल वाजवणाऱ्या महापालिकेचा ढोल नागपूरकरांनी ‘स्मार्ट नागपूरकर’ या फेसबुक पानावर वाजवला. शहर अत्याधुनिक होत आहे याचे समर्थन या पानावर होत आहे, पण पर्यावरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षावर नागपूरकरांनी चांगलेच कोरडे ओढले आहेत. त्याचवेळी नागपूर महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोपही काहींनी केला आहे. महापालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून फेसबुक पान सुरू केले आहे आणि या माध्यमातून विकास कामाच्या प्रचाराचा डंका वाजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत फेसबुक पान सुरू का नाही केले? जेथे गरज नाही, तेथेही रस्त्याचे सिमेंटीकरण करून काय फायदा होणार आहे. इथपासून तर काहींनी शहराच्या अत्याधुनिकीकरणाचे कौतुकही केले आहे.

स्मार्ट नागपूरकरवरील काही निवडक प्रतिक्रिया

  • डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून कर भरणाऱ्या नागपूरकरांच्या पैशाची नासाडी करण्यापेक्षा ज्या खेडेगावात जायला साधा रस्ता नाही, तिथे रस्ते बनवले तर काही उपयोग होईल, अशी सूचनावजा प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केली.
  • रस्ते लोकांना नोकरी देणार आहेत का? सगळे नोकरी शोधण्यासाठी नागपुरातून बाहेर पडत आहेत. हे तुम्हाला दिसत नाही का? आधी लोकांच्या मूळ गरजा भागवा आणि मग रस्ते बनवा निवडणुका आल्यावरच तुम्हाला सगळे सुचते का? अशी जळवळीत प्रतिक्रिया तरुणाईने व्यक्त केली.
  • नागपुरात काम चांगले होतेय, पण सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढणार. कारण पावसाचे पाणी जमिनीत जाणारच नाही, परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी कमी होईल. रस्त्यांचे ठीक आहे, पण भविष्यात नागपुरात पाण्याची कमतरता निश्चितच जाणवणार आहे, अशी भीती एका पर्यावरणवादी महिलेने व्यक्त केली.
  • ‘नागपूर महापालिकेने आधी अतिक्रमण हटवून पदपथ मोकळे करून दुरुस्त करावे. कारण रस्ते सतत वाहते असतात आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नसते. हे रस्त्याचे मूळ असून त्याचीच वानवा आहे. फुटपाथ अतिशय वाईट अवस्थेत असून, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • स्मार्ट सिटी म्हणल्याने शहर स्मार्ट होत नाही. नागपुरात गुन्हेगारी किती वाढली आहे? महिला तर सोडाच, पण माणसेही सुरक्षित नाहीत. कधीही खून होतात, कधीही महिलांवर हल्ले होतात.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur city modernization
First published on: 17-02-2017 at 00:27 IST