नागपूर : शहरात एप्रिलमध्येच उन्हाची तीव्रता वाढली आहे. दोन दिवसांपासून दैनंदिन तापमान ४४ अंश सेल्सियसहून अधिक नोंदवले जात आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जिल्ह्यात धरणातील जलसाठ्यांवरही होऊ लागला आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी ४० टक्क्यांच्या खाली गेली आहे. अजून दोन महिने शिल्लक असल्याने पुढील काळात पाण्याबाबत चिंता वाढण्याची शक्यता आहे.

प्रखर उन्हामुळे होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा फटका जलसाठ्यांवर होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. जलसपंदा विभागाच्या नोंदीनुसार, २० तारखेला जिल्ह्यातील १६ मोठ्या प्रकल्पात ३८.३९ टक्के पाणी होते. मागच्या वर्षी याच दिवशी (२०एप्रिल) या धरणात ४३.५९ टक्के पाणी होते. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पाच टक्के घट आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४२ मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. त्यात सद्यस्थितीत ३९.७९ टक्केच पाणी आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये हे प्रकल्प निम्मे म्हणजे ५० टक्के भरले होते.

गतवर्षीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पात ११ टक्के कमी जलसाठा आहे. छोट्या प्रकल्पाचे चित्र किंचित वेगळे आहे. नागपूर शहराला दररोज ४७० एमएलडी पाण्याची गरज असून ते पेंच प्रकल्पासह अन्य प्रकल्पातून शहरात आणले जाते. त्यावर प्रक्रिया केल्यावर लोकांना पुरवठा केला जातो. मोठ्या धरणांमध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ४० टक्क्यांहून कमी जलसाठा असल्याने पुढील दोन महिन्यात बिकट स्थिती निर्माण होऊ शकते.

उन्हाची तीव्रता अशीच राहिली तर नागपूरकरांची तहान कशी भागवायची असा प्रश्न महापालिकेपुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना व बावनकुळे पालकमंत्री असताना नागपुरात पाणी प्रश्न निर्माण झाला होता, हे येथे उल्लेखनीय.