उन्हाळी परीक्षांसाठी गृह महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आला आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असणारे ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ प्राचार्यांनी लिपिकाकडे दिल्याचा गैरफायदा घेत परीक्षेच्या वेळेपूर्वीच लिपिक प्रश्नपत्रिका ‘डाऊनलोड’ करून विद्यार्थ्यांना विकत असल्याची माहिती आहे.
हा प्रकार अनेक महाविद्यालयांमध्ये सुरू असून हिंगणा रोडवरील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शुक्रवारी अशीच घटना उघडकीस आली. पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली होती. परीक्षा विभागाच्या सतर्कतेमुळे ऐन वेळेवर परीक्षा रद्द करण्यात यश आले.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकाराची रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. दोन दिवसांआधीच एका खोलीतील महाविद्यालय व तेथेच परीक्षा केंद्र असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता शहरातील नामवंत अशा प्रियदर्शिनी अभियांत्रिकीमध्ये पेपर फुटल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास प्रियदर्शिनी महाविद्यालयामध्ये पेपर फुटल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळाली. यानंतर परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे व अधिकाऱ्यांनी महाविद्यालयामध्ये भेट देत परीक्षा रद्द केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य परीक्षा केंद्रावर उपस्थित नव्हते. काही वेळाने प्राचार्य तेथे पोहचले. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणारे पासवर्ड आणि ‘युजर आयडी’ एका लिपिकाला दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या लिपिकाकडूनच हा गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय आहे. या प्रकरणात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कठोर भूमिका घेत महाविद्यालयावर कारवाई केली आहे.
अशी फुटते प्रश्नपत्रिका… –
विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका तयार करून त्या महाविद्यालयाला ऑनलाईन माध्यमातून पाठवण्यात येतात. ई-मेलवर आलेल्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी प्राचार्य किंवा परीक्षा प्रमुखांना युजर आयडी आणि पासवर्ड दिला जातो. मात्र, महाविद्यालये हा युजर आयडी आणि पासवर्ड लिपिकाला देतात. या विश्वासाचा गैरफायदा घेत लिपिक प्राचार्य येण्याआधीच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून ती त्याच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना पाठवतो. त्यानंतर प्राचार्य आल्यावर परीक्षा सुरू करण्याआधी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून परीक्षा घेतली जाते. अशाप्रकारे दोनदा प्रश्नपत्रिका डाऊनलोड होत असल्याचा प्रकारही शुक्रवारी उघडकीस आला.
सात पेपर रद्द –
प्रियदर्शिनी महाविद्यालयातील या गोंधळाच्या माहितीनंतर विद्यापीठाने हे परीक्षा केंद्र रद्द केले. या महाविद्यालयामध्ये पुढे होणारे सात पेपरही रद्द केले. तसेच येथील विद्यार्थ्यांची परीक्षाही दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. या महाविद्यालयात आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व पेपरमधील गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णयही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयात आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरची तपासणी होणार आहे.