नागपूर: शासकीय काम आणि दहा दिवस थांब अशी सध्या शासनाच्या विविध विभागातील कामाची पद्धत असल्याची ओरड नागरिकांकडून नेहमीच होत असते. या कामासाठी सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारूनही काम होत नाही. दरम्यान एका तहसीलदाराने तहसील कार्यालयातील खुर्चीवर बसून उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांपूढे चक्क गाणी गाण्याचे कार्यक्रम केल्याचे पुढे येत आहे. हा व्हिडिओ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांवर प्रसारीत करत रिअॅलिटी शोचा उल्लेख करून शासनावर कडाडून टिका केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकारवर मत चोरीचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपांची एकही संधी सोडली जात नाही. काँग्रेसकडून आता नागपूरसह राज्यातील विविध भागात मत चोरीच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेते मतचोरीसह इतर विषयावरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच उमरी, नांदेड येथील तहसील कार्यालयातील तहसीलदराच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्याद्वारे गाणे म्हणण्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात तहसीलदार गाणे म्हणत असतांना समोर कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी बसून त्याला दाद देत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते यांनी संताप व्यक्त करत समाज माध्यमांवर सरकारचे कान टोचले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे म्हणने काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर उमरी, नांदेड येथील तहसीलदार गाणे म्हणत असल्याचे व्हिडिओ शेअर करत सरकारचे कान टोचले आहे. विजय वडेट्टीवारांनी पोस्टमध्ये लिहले की, महाराष्ट्रात शासन आणि प्रशासनाने एखाद्या रिॲलिटी शोचे आयोजन करावे. हल्ली अधिकारी, कर्मचारी यांना झालंय काय ? हा प्रश्न सामान्यांना पडतोय. लोकांचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे वेळ नाही. शासकीय कार्यालयात दहा- दहा चकरा मारून लोकांचे कामे होत नाही. पण हे अधिकारी खुर्चीत बसून मात्र विविध कलागुणांचे प्रदर्शन मांडतात.
गाणी गात, उत्सव साजरे करावेत पण ज्या खुर्चीवर बसले आहात, तिचा मान तरी ठेवा. ती खुर्ची काम करण्यासाठी आहे, रिल बनवण्यासाठी नाही. सरकारने सोशल मीडियासाठी आचारसंहिता काढलीच होती ना. तर आता एक “शासकीय कार्यालय आचारसंहिता” पण काढावी. किमान तहसीलदार साहेबांना खुर्चीत बसून गायक बनण्याची दुर्बुद्धी तरी सुचणार नाही. खुर्चीची मर्जी राखून कोणीतरी व्वा.. व्वा.. म्हणतो म्हणून रिल बनवणाऱ्यांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.