नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग, पूल, उड्डाणपूल बांधणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय महामार्गासोबत नागपूर शहरात देखील उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. मात्र, काही महिन्यात या पुलांची गुणवत्ता आणि डिझाईनबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजघडीला बुटीबोरी उड्डाणपूल, पारडी उड्डाणपुलाच्या दोन स्पॅनमध्ये मोठी फट दिसून येत आहे. वाडी उड्डाणपुलास तडे गेले आहे तर मानकापूर भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे.
अवघ्या दोन वर्षांत पूर्व नागपुरातील पारडी उड्डाणपुलात (इतवारी ते भंडारा रोड) दोन स्पॅनमध्ये फट निर्माण झाली आहे. हे उड्डाणपूल ७ किमीचे असून या उड्डाणपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू झाले होते. २०१९ पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, अनेक वेळा अडचणींमुळे ते पूर्ण झाले नाही. डिझाइनमधील बदल आणि इतर बदल यासह अनेक बाबींमुळे, जवळजवळ एक दशकानंतर पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले. सुरुवातीला हा उड्डाणपूल ४४८ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला जाणार होता, परंतु खर्च ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजी करून पाच महिन्यानंतर मे महिन्यात बुटीबोरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, आता एक नवीनच समस्या समोर आली आहे. या पुलाच्या दोन गर्डरमध्ये मोठी फट निर्माण झाली आहे. ती वाढून वाहनांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलात मोठी फट दिसून येत आहे. यासंदर्भातील चित्रफित प्रसारित झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये या पुलास तडे गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात फट निर्माण झाल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता असल्याची चर्चा आहे.
अपघात होण्याची शक्यता
अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाडी पोलीस ठाणे ते गुरूद्वारापर्यंत उड्डाणपुलास तडे गेले आहे. हा मुख्य पुलापासून वेगळा झालेला सिमेंट कॉक्रीट गोळा पडून लाहन चालकाचा अपघात होण्याची शक्यता आहे. नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाडी पोलीस ठाणे ते गुरूद्वारापर्यंतच्या २.३ किलोमीटरच्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील रवीनगरपासून वाडीपर्यंतच्या एकूण ५.५ किलोमीटरच्या दोन टप्प्यांतील या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे ठरले होते. त्यासाठी एकूण ४७८ कोटींचा खर्च मंजूर झाला होता. त्यानुसार कंत्राटदाराने पुलाचे काम मार्च २०२२ पासून सुरू केले. पहिल्या टप्प्यात २४५ कोटी रुपयांचा वाडी उड्डाणपुलावर रहदारी सुरू झाली. तर दुसऱ्या टप्प्यात आर.टी.ओ. कार्यालय ते विद्यापीठ परिसर दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मानकापूर अंडर ब्रिज १५ दिवसांपासून बंद
उत्तर नागपुरातील मानकापूर येथील भुयारी मार्ग (अंडर ब्रिज) गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. येथे चार ते पाच फूट पाणी साचले आहे. ओमनगर, शंभूनगर, आर्यनगर, इरोस समिती, नुरी कॉलनी, प्रिती सोसायटी या भागातील शेकडो नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. दुचाकी, चारचाकी, स्कूल बसेस आणि विविध कामांना जाणारे लोक या मार्गाचा वापर करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या पुलात ४ ते ५ फूट पाणी साचलेले आहे. ते पाणी काढून मार्ग मोकळा करण्यासाठी महापालिका, नासुप्र कोणीही पुढाकार घेत नाही. स्थानिक नेते देखील याकडे देण्यास तयार नाही. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून या भागातील नागरिकांना ५ ते ६ किलोमीटर फिरून घरी पोहोचावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ९.८ कोटी रुपये खर्च करून हे भुयारी मार्ग बांधले. परंतु, या भुयारी मार्गाकडे कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही. नरेंद्रनगर, मनीषनगर भुयारी मार्गाचे तातडीने पाणी काढले जाते, पण उत्तर नागपुरातील लोकांबद्दल कायमच दुजाभाव केला जात आहे, असा आरोप ॲड. रवींद्र गडोडे यांनी केला.