नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहावा, यासाठी पोलीस वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत आहेत. पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन यांनी परीमंडळाच्या हद्दीतील ‘रेकॉर्ड’वर असलेल्या सर्वच गुन्हेगारांची हुडकेश्वर पोलीस ठाण्यात ‘परेड’ केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास खैर केली जाणार नाही, असा सज्जड दम गुन्हेगारांना दिला.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कुठल्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून पोलिसांनी प्रयत्न करणे सुरु केले आहे. परिमंडळ क्रमांक ४ च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन. यांनी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘रेकॉर्ड’वरील ५२ गुन्हेगारांना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या आवारात बोलावले. सर्व गुन्हेगारांना मैदानात बसवले आणि त्यांना कायदा-सुव्यवस्थे संदर्भातील आवश्यक सूचना दिल्या. यात अजनी येथील १३, नंदनवन येथील १६, सक्करदरा येथील ७, वाठोडा २ आणि हुडकेश्वर येथील ४ गुन्हेगारांचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिमंडळातील ‘रेकॉर्ड’वरील राजकीय गुंड, भू-माफिया, मकोकातून सुटलेले आरोपी, मध्यवर्ती कारागृहातून स्थानबद्धतेच्या आरोपातून (एम.पी.डी.ए रिलीज) सुटलेले आरोपी व ‘हिस्ट्रिशिटर’ गुन्हेगारांचा या ‘परेड’मध्ये समावेश होता. गुन्हेगारांकडून सबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी हमी घेण्यात आली. याकरिता कलम ६८ म.पो.का अन्वये त्यांना ताब्यात घेऊन पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी त्यांचे समुपदेशन करून योग्य सूचना देत कलम ६९ म.पो.का अन्वये सोडण्यात आले.

हेही वाचा…विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक

पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी झोन-चारचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता. प्रत्येक गुन्हेगारावर ‘वॉच’ ठेवण्यात येत होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर अंकुश ठेवला होता. पोलीस उपायुक्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.