अमरावती : शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाखालील वाहतूक धोकादायक असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आला असतानाही, त्याखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी हे निर्देश दिले आहेत.
संयुक्त समितीची स्थापना, अहवाल सादर करण्याचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एक संयुक्त पाहणी पथक तातडीने स्थापन करावे. या पथकात पुलाला असुरक्षित घोषित करणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटचाही समावेश करण्यात यावा. हे पथक रेल्वे वाहतुकीला असलेल्या धोक्याचे मूल्यांकन करेल आणि पुलाच्या संरचनेची सद्यस्थिती तपासणार आहे.
रेल्वे वाहतुकीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज
पुलावरून वाहतूक बंद असली तरी, पुलाखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने मोठा धोका संभवतो. त्यामुळे, पूल सुरक्षित करेपर्यंत किंवा तो पाडण्यात येईपर्यंत रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करण्याची तातडीची गरज आहे का, यासंदर्भात पथकाने आपला अहवाल आणि शिफारशी २५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
रेल्वे विभागाला विशेष सूचना
संयुक्त पाहणीमधील शिफारशीनुसार रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करणे, पुलाचे गर्डर्स (गाळ्यांचे तुळई) आणि सुपरस्ट्रक्चर नियंत्रित व सुरक्षित पद्धतीने पाडण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करणे, पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व गाड्यांना वेगमर्यादा लागू करणे, पुलाच्या संरचनेतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ देखरेख कर्मचाऱ्याची नेमणूक करणे, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपकरणे आणि पथके तयार ठेवणे, या सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागालाही निर्देश
सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे रुळाखालील बेलपुराकडे जाणारा समांतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याबाबत खात्री करून तसे प्रमाणपत्र द्यावे, असे सांगण्यात आले आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक आणि इतर उपाययोजना करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आदेशाचे तात्काळ पालन न झाल्यास राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचल्याने या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक २४ ऑगस्टपासून बंद करण्यात आली. भिंत उभारून हा पूल कायमस्वरूपी बंद केला आहे.
