नागपूर : वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत वनखात्याच्या अनेक योजनांची माहिती पत्रकारांना दिली होती. त्यात मानव-वन्यजीव संघर्षावरील उपायांपासून तर जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या पडीत जमिनीसंदर्भातल्या अनेक योजना होत्या. मात्र, आता त्यांच्या या योजनांवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी दावा ठोकला आहे.
नागपूरात पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जंगलाशी संबंधीत काही योजनांची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी मानव-वन्यजीव संघर्षावर कृत्रिम बुद्धीमता प्रणालीवर आधारित यंत्रणा वापरात आणणार असून त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे सांगितले. तर आता अशाच एका योजनेवर त्यांनी स्वत:चा दावा ठोकला आहे.
वनमंत्र्यांनी मी एक योजना दिली. जंगलाला लागून असणारी शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत आहेत. वन्यप्राण्यांमुळे घाबरुन शेतकऱ्यांनी जमीन कसणे सोडले आहे. या पडीत जमिनी आम्ही ३० वर्षांकरिता घेणार आणि एकरी वर्षाचे त्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणार. ही योजना मीच वनमंत्र्यांना दिली, असे बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या जमिनीवर वनविभाग सौर उर्जा प्रकल्प, बांबू लागवडीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
तसेच याठिकाणी गवताळ प्रदेश विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही योजना नक्कीच काम करेल. सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर जंगलात शेतकरी काम करतात. त्यांना ५० हजार रुपये एकरी वर्षाचे देण्यात येतील. याबाबत लवकरच महाराष्ट्र सरकार सामंजस्य करार करणार आहे, त्यामुळे पडीत जमिनीचा प्रश्न निकाली निघेल, असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रशासनाला आदेश दिले आहेत.
आमचे नागपूरचे जवळपास पंचनामे झाले. विदर्भातील पंचनामे लवकर होतील, असेही बावनकुळे म्हणाले. आम्ही पंचनामे करुन आणि नुकसान भरपाई देऊ, असेही त्यांनी सांगितले. वृक्षलागवडीच्या उद्दीष्टासंदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्ही दीड कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट स्वीकारले आहे. औष्णिक वीज केंद्र जास्त प्रदूषण होतात त्यांनी जास्त टार्गेट घ्यावे, असेही ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकारचे विभागातील अधिकारी या बैठकीला होते.
येत्या ३० ऑगस्टपर्यंत नागपूरला दीड कोटी झाडे लावण्याचे उद्दीष्ट आम्ही करतोय, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. जिल्हा परिषद १५ जुलैला उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. हे फक्त एक उद्दीष्ट नाही तर ती हरितक्रांती आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागाचा १५ ऑगस्टला सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.